पुणे : बुलेट ट्रेनसाठी ‘पीएमआरडीए’ हद्दीत पुन्हा सर्वेक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PMRDA
पुणे : बुलेट ट्रेनसाठी ‘पीएमआरडीए’ हद्दीत पुन्हा सर्वेक्षण

पुणे : बुलेट ट्रेनसाठी ‘पीएमआरडीए’ हद्दीत पुन्हा सर्वेक्षण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरसाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत पुन्हा सर्वेक्षण करून मार्ग निश्‍चित करावा. त्यानंतर त्याचा समावेश ‘पीएमआरडीए’च्या विकास आराखड्यात करावा, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे.

भारतीय हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने देशभरात आठ ठिकाणी बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये मुंबई-नागपूर आणि मुंबई-पुणे-हैदराबाद असे दोन प्रकल्प आहेत. त्यापैकी हा एक प्रकल्प आहे. ही ट्रेन ताशी २५० ते ३२० किमी वेगाने धावणार आहे. मुंबई ते हैदराबाद अंतर सुमारे ७११ किलोमीटरचे आहे, ते ही ट्रेन साडेतीन तासात कापणार आहे. या ट्रेनच्या मार्गावर पुणे, सोलापूर, पंढरपूर असे मोजके थांबे असणार आहेत. या रेल्वेसाठी स्वतंत्र ट्रॅक टाकण्यात येणार आहे.

हेही वाचा: Pune : SRA प्राधिकरण आणि मनपाकडून झोपडपट्टीधारकांवर कारवाई

या रेल्वेचा मार्ग ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतून जातो. लोणावळ्यापासून पुणे, मांजरी, सासवड या हद्दीतून जातो. तसेच, ‘पीएमआरडीए’ने विकास आराखड्यात ग्रोथ सेंटर प्रस्तावित केले आहेत. त्यातून हा मार्ग जातो. मात्र, विकास आराखड्यात हा रेल्वे मार्ग प्रस्तावित केलेला नाही. तो समाविष्ट करावा, यासाठी हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने यापूर्वी ‘पीएमआरडीए’ला पत्रदेखील दिले होते. मध्यंतरी, या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ‘पीएमआरडीए’चे आयुक्त सुहास दिवसे यांची भेट घेऊन प्रस्तावित विकास आराखड्यात हा रेल्वे मार्ग दर्शविण्याविषयी चर्चा केली. त्यानंतर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत यासंदर्भात एक बैठक झाली.

प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे प्रारूप विकास आराखड्यात दर्शविलेल्या ग्रोथ सेंटरला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या मार्गाचे हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन आणि ‘पीएमआरडीए’ने एकत्रित सर्व्हेक्षण करून नवीन मार्ग प्रस्ताविक करावा. त्यास हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने मान्यता दिल्यानंतर त्याचा समावेश विकास आराखड्यात करावा, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे पुन्हा या रेल्वे मार्गासाठी एकत्रित सर्व्हेक्षणाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

loading image
go to top