सेवानिवृत्त जवानांची गावात जंगी मिरवणूक 

नागनाथ शिंगाडे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

लष्करात सेवा करून परतलेल्या तीन सुपुत्रांचे श्री क्षेत्र विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांनी भव्य मिरवणूक काढून जंगी स्वागत केले.

तळेगाव ढमढेरे (पुणे) : लष्करात सेवा करून परतलेल्या तीन सुपुत्रांचे श्री क्षेत्र विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांनी भव्य मिरवणूक काढून जंगी स्वागत केले. 

विठ्ठलवाडी येथील सुनील नानासाहेब गवारे, शिवाजी सखाराम दोरगे व चंद्रशेखर रामदास दोरगे हे तीन जवान प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. त्यांच्या कर्तव्याला व शौर्याला सलाम करण्यासाठी येथील महानुभाव मळ्यातील श्रीकृष्ण युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांतर्फे त्यांचे जंगी स्वागत करून सवाद्य भव्य मिरवणूक काढली. या वेळी गावातील सुवासिनींनी जवानांचे औक्षण करून स्वागत केले. "भारत माता की जय'च्या घोषणा देत महिला, बालक व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

या मिरवणुकीनंतर तीनही जवानांचा माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी पलांडे म्हणाले, ""आज समाजात निवृत्त होऊन गावी परतणाऱ्या जवानांप्रती लोकांमध्ये लक्षणीय आदर असून, असे प्रेक्षणीय कार्यक्रम प्रत्येक गावात होणे गरजेचे आहेत. देशाच्या सीमारेषेचे संरक्षण जवानच करतात. त्यामुळे आपण आपल्या घरी सुरक्षित राहतो.''

या वेळी आबासाहेब गव्हाणे, मुख्याध्यापक सुरेश थोरात, शिवाजी दोरगे, सुनील गवारे, चंद्रशेखर दोरगे, शिरूर केसरी अविनाश गवारे आदींनी मनोगत व्यक्त केले. 
लष्करातून निवृत्ती हा संघर्षाचा शेवट नसून, नव्या प्रवासाची एक आनंददायी सुरवात आहे, ही भावना तीनही जवानांच्या मनोगतातून ऐकायला मिळाली. या वेळी तीनही जवानांचा कुटुंबासह शाल, श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. 

माजी उपसरपंच सोपानराव गवारे यांनी प्रास्ताविक, मधुकर दोरगे यांनी स्वागत; तर राहुल गवारे यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब गवारे यांनी आभार मानले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Retired Jawans received a warm welcome from Vitthalwadi villagers