भातलावणीला आधार यंत्रांचा अन्‌ कातकऱ्यांचा!

Rice-Plantation
Rice-Plantation

पौड - मुळशी तालुक्‍यात भातलावणीची कामे सध्या अंतिम टप्प्यात आहे. गोठे इतिहासजमा झाल्याने मशागतीसाठी बैलांची कमतरता जाणवली, तर घराघरांत राजकारण घुसल्याने शेतात राबणारे गावकीभावकीतील मनुष्यबळही अपुरे पडले. त्यामुळे सध्या मशागतीसाठी यंत्र आणि भातलावणीच्या कामासाठी कोकणातल्या कातकऱ्यांचा आधार मुळशीतील शेतकऱ्यांना आहे.

जिल्ह्यात सर्वांत जास्त पर्जन्यमान असलेल्या मुळशी तालुक्‍याला भाताचे आगार समजले जाते. एकेकाळी येथील आंबेमोहोराचा सुगंध पुण्या-मुंबईपर्यंत दरवळत होता. बैलजोडीच्या मदतीने शेतकरी मशागत करायचा, तर गावातील वाडी किंवा आळीआळींतील शेतकरी कुटुंबे एकत्र येऊन भातलावणीची कामे उरकत होती. ‘एकमेकां साह्य करू’ अशा पद्धतीने शेतातील विविध पिकांच्या लागवडीची कामे होत होती. 

बदलत्या तंत्रज्ञानामुळे ग्रामीण जीवनात बदल होत आहेत. तालुक्‍यातील गोठे इतिहासजमा होत असून, जनावरांची संख्याही कमी होत आहे, त्यामुळे खाचरातील मशागतीसाठी बैलाची जागा आता यंत्राने घ्यायला सुरवात केली आहे. ग्रामपंचायत निवडणुका, पक्षीय मतभेद यामुळे गावकी भावकीतही मतभेद, भांडणतंटा होत आहे. परिणामी, शेतीकामासाठी एकमेकांस आता मदत करणे कमी झाले आहे. त्यामुळे भातलावणीसाठी पारंपरिक असलेले हंदा, पडकील हे शब्दही आता इतिहासजमा होऊ लागले आहेत.

भातलावणीच्या कामासाठी तालुक्‍यात कोकणातून कातकरी कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले आहे. प्रत्येक व्यक्तीला दररोज साडेतीनशे रुपये, दोन वेळचे जेवण आणि दारू द्यावी लागते, तसेच त्यांच्या राहण्याचीही सोय करावी लागते. शेतकरी कोकणात जाऊन चारचाकी गाडीतून कातकरी कुटुंबांना शेतापर्यंत आणत आहेत.

भातखाचरात चिखल करण्यासाठी औत मिळणे मुश्‍कील झाले आहे, तसेच औताद्वारे चिखलणी करण्यास वेळही खूप जातो. कृषी शास्त्रज्ञांनी शेतात कमी वेळेत जास्तीत जास्त काम करणारी यंत्रेही तयार केली आहेत. या यंत्रांच्या साह्याने खाचरात चिखलणीची कामे केली जातात. काही शेतकऱ्यांनी तर यंत्राच्याच साह्याने भाताची रोपे काढून, भातलावणीची कामेही उरकली आहेत. त्यामुळे भातलावणीसाठी यंत्राचा आणि कोकणातील कातकऱ्यांचा आधार मिळाल्याने उशिरा का होईना लावणीचे काम पूर्ण होऊ शकले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com