रिक्षाचालकही होणार ‘कॅशलेस’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

पुणे - कॅशलेस इंडिया मोहिमेत रिक्षा चालकांनाही सहभागी करून घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी मंगळवारी पहिल्या टप्प्यात कॅशलेस (रोकड विरहित) व्यवहार कसा करावा, याचे प्रशिक्षण देण्यात आले. आरटीओच्या या प्रयत्नामुळे प्रवाशांची सोय होणार असून रिक्षा चालकांनाही स्पर्धेत टिकून राहणे शक्‍य होणार आहे.

केंद्र सरकारने जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करून दोन हजार रुपयांचे नवे चलन बाजारात आणले. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर सुट्ट्या पैशांची अडचण निर्माण झाली. तसेच कॅशलेस व्यवहाराला सरकारकडून प्राधान्य दिले जात आहे. रिक्षा चालकांनाही कॅशलेस व्यवहाराकडे वळविण्यासाठी आरटीओने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी शहरातील रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी आणि रिक्षाचालक यांना कॅशलेस व्यवहार कसा करावा, याचे प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी उपप्रादेशिक अधिकारी अनिल पाटील, एसबीआय बॅंकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

एसबीआय बॅंकेने ‘पेटीएम’च्या धर्तीवर ‘एसबीआय बडी’ हे नवीन मोबाईल पेमेंट वॉलेट ॲप तयार केले आहे. त्याचप्रमाणे खिशात ठेवता येणारे पॉइंट ऑफ सेल (पीओएस) मशिन तयार केले आहे. ते कसे वापरावे, यांचे सादरीकरण बॅंकेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले. रिक्षा चालकांना कॅशलेस व्यवसाय करताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, हा त्या मागील उद्देश आहे. यापुढेही अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जाईल.
- अनिल पाटील, उपप्रादेशिक अधिकारी

Web Title: rickshawdriver cashless