रिंगरोड बदलांच्या फेऱ्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

अतिक्रमणांचा फटका
रिंगरोडची प्रस्तावित रुंदी ९० वरून ११० मीटर करण्यात आली आहे. मात्र, या नियोजित रस्त्याच्या काही भागांत अतिक्रमणे; तर काही ठिकाणी बांधकामांना परवानगी देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे धायरी येथे रिंगरोडमध्ये बदल करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला होता.

पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) रिंगरोड बदल आणि हरकती-सूचनांमधून बाहेर पडण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे. यापूर्वी धायरीसह अकरा ठिकाणी रिंगरोडमध्ये करण्यात आलेल्या बदलानंतर नव्याने चार ठिकाणच्या बदलावर हरकती मागविण्याचा आदेश सरकारने दिला आहे.

धायरीनंतर आता भूगाव, मौजे मारुंजी आणि वडकी या ठिकाणीदेखील रिंगरोडमध्ये बदल करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला. तेथील नागरिकांच्या हरकती-सूचना मागविण्याचा आदेश मध्यंतरी राज्य सरकारने दिला होता. त्यानुसार नगररचना विभागाने हरकती-सूचना मागवून त्यावर सुनावणी घेतली. सुनावणी अहवाल आणि त्यावर आपला अभिप्राय नगररचना विभागाने राज्य सरकारकडे पाठविला होता. 

राज्य सरकारने या बदलास नुकतीच मान्यता दिली. तसा आदेश राज्य सरकारच्या नगरविकास विभागाचे अवर सचिव  किशोर गोखले यांनी १३ सप्टेंबर रोजी काढला. त्याच दिवशी मौजे सोळू, लोणीकंद, केसनंद आणि मांजरी (खुर्द) येथील मार्गातील बदल प्रस्तावित करण्याचा आदेश गोखले यांनी काढला आहे. त्या ठिकाणी ९० मीटर रुदीचा रस्ता प्रादेशिक विकास आराखड्यात प्रस्तावित करण्यात आला होता. त्यापासून ५ ते ७ मीटर अंतरावर ११० मीटर रुंदीच्या रस्त्याची आखणी केली आहे. त्यामुळे या चार गावांतील रिंगरोडची आखणी वगळून त्या जमिनींलगतच्या झोनमध्ये समाविष्ट करण्यासाठी हरकती-सूचना मागविण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. रिंगरोडची आखणी सदोष झाल्यामुळे वारंवार बदल करावा लागत असल्याचे बोलले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ringroad Issue Pune