रिंगरोडसाठी पाऊल पडते पुढे!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

असा असेल दुसरा टप्प्पा
‘एमएसआरडीसी’कडून पहिल्या टप्यात ६६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील पूर्व भागातील रिंगरोडचे काम हाती घेण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील रिंगरोड हा मरकळ, सोळू, लोणीकंद, भिवरी, कोरेगाव मूळ, सानोरी, दिवे, चांबळी, हिवरे, गराडे, कांबरी, वरवे बुद्रुक असा असणार आहे.

पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडच्या दुसऱ्या टप्प्याचे (पूर्व भाग) सर्व्हेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या चार तालुक्‍यांतून जाणार हा रस्ता सुमारे ६२ किलोमीटर लांबीचा असणार आहे.

या मार्गाचे आतापर्यंत एकूण १२८ किलोमीटरचे सर्वेक्षण झाले आहे. ‘एमएसआरडीसी’कडून पश्‍चिम भागातील रिंगरोडचे सर्वेक्षण यापूर्वी केले आहे. त्यास राज्य सरकारची मान्यता मिळाली असून, या मार्गाला राज्य महामार्गाचा दर्जा मिळण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यापाठोपाठ पूर्व भागातील रिंगरोडच्या सर्व्हेक्षणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

हा टप्पा सुमारे ६२ किलोमीटर लांबीचा असणार आहे. नगर रस्त्यावरील मरकळपासून तो सुरू होणार असून, पुणे- सातारा रस्त्यावरील वरवे बुद्रुक येथे येऊन तो मिळणार आहे. पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळावर जाण्यासाठीचा मार्ग देखील त्यामुळे उपलब्ध होणार आहे. ‘पीएमआरडीए’ने रिंगरोडला समांतर असलेला भाग वगळून ‘एमएसआरडीसी’ने नव्याने सर्वेक्षण करून या रिंगरोडची आखणी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

प्रकल्पासाठी १४ हजार कोटी अपेक्षित 
या रिंगरोडची एकूण लांबी सुमारे १६६ किलोमीटर आहे. खेड शिरूर, पुरंदर, हवेली, भोर, वेल्हा आणि मुळशी या तालुक्‍यांतून रिंगरोड जाणार आहे. यासाठी २३०० हेक्‍टर जागेची आवश्‍यकता असून, प्रकल्पासाठी सुमारे १४ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. 

असा असेल दुसरा टप्प्पा
‘एमएसआरडीसी’कडून पहिल्या टप्यात ६६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील पूर्व भागातील रिंगरोडचे काम हाती घेण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील रिंगरोड हा मरकळ, सोळू, लोणीकंद, भिवरी, कोरेगाव मूळ, सानोरी, दिवे, चांबळी, हिवरे, गराडे, कांबरी, वरवे बुद्रुक असा असणार आहे.

Web Title: Ringroad Survey Work Development