पुरंदर विमानतळ : जमीन न देण्यासाठी रिसे, पिसे, राजुरी, पांडेश्वर येथाील ग्रामस्थ आक्रमक 

दत्ता जाधव
Friday, 22 January 2021

रिसे, पिसे, पांडेश्वर परिसरात विमानतळासाठी विमानतळ ऑफ इंडियाने तत्वतः मान्यता दिल्याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच या परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. 

माळशिरस : रिसे, पिसे, पांडेश्वर परिसरात विमानतळासाठी विमानतळ ऑफ इंडियाने तत्वतः मान्यता दिल्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर या परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. विमानतळासाठी कुठल्याही किंमतीत आपल्या जमिनी द्यायच्या नाहीत, अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. यासाठीच या सर्व गावातील शेतकऱ्यांनी आज संध्याकाळी राजुरी येथे सर्व शेतकरी व ग्रामस्थांची बैठक बोलावली आहे.

म्हाडाच्या ५६४७ सदनिकांची आज Online सोडत; कोणाचं गृहस्वप्न होणार साकार?

पुरंदर तालुक्यातील पारगाव परिसरातील सात गावांमध्ये यापुर्वी विमानतळासाठी जागा निश्चित होऊन आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आल्या होत्या. मात्र येथील शेतकऱ्यांनी विमानतळासाठी जमिनी देण्यास विरोध दर्शविल्याने व त्यांच्या आग्रहानुसार आमदार संजय जगताप यांनी देखील येथील जागा बदलण्यासाठी विधानसभा निवडणुकी अगोदर दिलेल्या आश्वासनानुसार पर्यायी जागा म्हणून रिसे पिसे, पांडेश्वर येथील नव्याने जागा मध्यंतरी झालेल्या पुण्यातील बैठकीत सुचवली.

दरम्यान, या जागेची शासकीय स्तरावरती पाहणी झाल्यानंतर सध्या विमानतळ ऑथोरिटी ऑफ इंडियाने या जागेत विमानतळ करणे शक्य असल्याबाबतची तत्वतः मान्यता दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. यामुळे या चारही गावातील शेतकरी चिंतेत पडले असून, आक्रमक दिसत आहेत.

आम्हाला विमानतळापेक्षा आमच्या जमिनी महत्त्वाच्या आहेत, असे अनेक शेतकरी उघडपणे बोलू लागले आहेत. कुठल्याही परिस्थितीत शासनाला विमानतळासाठी आम्ही येथील इंचभरही जमीन देणार नाही व येथे विमानतळ होऊ देणार नाही असे शेतकरी आक्रमकपणे बोलू लागले आहेत. यामुळे या संतप्त शेतकऱ्यांनी विमानतळ विरोधी आपली भूमिका ठरवण्यासाठी राजुरी येथे संध्याकाळी बैठकीचे आयोजन केले असून, या बैठकीत विमानतळास कशा पद्धतीने विरोध करायचा याबाबतची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

...तर आमचा पायगुण वाईट आहे म्हणू नका ; अजित पवार यांची टोलेबाजी

सात गावांना वाचवण्यासाठी...
पारगाव परिसरातील गावांचा विरोध होत असल्याने त्या गावांना वाचवण्यासाठी शासन व तालुका प्रतिनिधी यांनी आम्हा शेतकऱ्यांना भूमिहीन करू नका असा भावनिक सुर देखील या भागातील शेतकरी घालत आहेत.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rise, iise, pandeshwar villages refuse to give land for airport