तापमान वाढल्याने कोरोनाचा प्रसार होतो कमी? जगभरातील संशोधकांचं नक्की मत काय आहे, ते वाचा!

Corona-Covid19
Corona-Covid19

पुणे : वाढत्या तापमान आणि आर्द्रतेमुळे अल्प प्रमाणात का होईना कोविड-19चा प्रसार मंदावतो, असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. मात्र, कोरोनाचा प्रसार पूर्णपणे थांबविण्यासाठी हे दोन्ही घटक परिपूर्ण नसल्याचेही संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

वाढत्या तापमानाचा कोविड-19च्या विषाणूवर नक्की काय परिणाम होतो, याबद्दल सामान्यांसह शास्त्रज्ञांनाही कुतूहल होते. मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेरच्या आयटीएम युनिव्हर्सिटीतील प्रा. डांगी रवी राय आणि प्रा. जॉर्ज मॅथ्यू, तसेच इजिप्तमधील कॅरिओ विद्यापीठातील प्रा. ऍडली ऍनीस यांनी केलेल्या संशोधनातून ही बाब पुढे आली आहे. तापमान 5 ते 17 अंश सेल्सिअस असलेल्या देशांमध्ये इतरांच्या तुलनेत वेगाने कोरोनाचा प्रसार झाल्याचे संशोधनातून पुढे आले आहे.

प्रामुख्याने मार्च आणि एप्रिल महिन्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येच्या आधारे हे विश्‍लेषण करण्यात आले आहे. 2002 मध्ये आलेल्या सार्स कोविड विषाणूंच्या उपलब्ध माहितीचाही यामध्ये वापर करण्यात आला आहे. तापमानापेक्षाही शारीरिक अंतर, प्रदूषण, विरळ लोकसंख्या आणि उपलब्ध वैद्यकीय सुविधा कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे संशोधक सांगत आहे. 

संशोधनाची पार्श्‍वभूमी 
- एका शिंकेतून साधारणपणे तीन हजार थेंब बाहेर पडतात, त्यामुळे प्रसाराचे प्रभावी माध्यम 
- 2002मध्ये आलेला सार्स कोव्हीड हा विषाणू 28 दिवस कमी तापमानाला जिवंत राहत 
- ऍनीस यांनी तुलनात्मक अभ्यासासाठी उष्ण असलेला उत्तर गोलार्धातील इजिप्त आणि तुलनेने थंड असलेला दक्षिण गोलार्धातील ऑस्ट्रेलियाची संशोधनासाठी निवड केली. 
- दोनही ठिकाणचा कोराना प्रसार लोकसंख्येची घनता, तापमान आणि आद्रता आदी घटकांवर अभ्यासण्यात आला.

संशोधनातील निष्कर्ष 
- मार्च महिन्यात वाढत्या तापमानाबरोबरच इजिप्तमधील कोरोना बाधितांची संख्या घटली, तर ऑस्ट्रेलियात संख्या वाढली. 
- साधारणपणे 5 ते 24 अंश सेल्सिअस तापमानाला आणि 47 ते 79 टक्के आद्रतेला कोविड-19 चा विषाणू जास्त सक्रिय असतो 
- अतिनील किरणे आणि आम्लयुक्त वातावरणात पृष्ठभागावरील कोविड-19ची सक्रियता मंदावते. 
- कोरोनाच्या प्रसारासाठी शारिरीक अंतर, लॉकडाउन, लोकसंख्येची घनता, सार्वजनिक एकत्रीकरणाला प्रतिबंध, नियमांचे काटेकोर पालन, कोविडच्या चाचण्यांचा वेग आणि वैद्यकीय सुविधा जास्त कारणीभूत. 

देशातील महत्त्वपूर्ण शहरांचे साम्य 

आयटीएम युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी देशातील 35 महत्त्वपूर्ण शहरांची लोकसंख्या, घनता, आंतरराष्ट्रीय विमानतळ आदींच्या आधारावर संशोधनासाठी निवड केली. लोकसंख्येच्या घनतेनुसार व्यक्तीच्या हालचालीवर आधारित 'पर्सन प्रॉडक्‍ट मोमेंट कोरीलेशन' पद्धतीचा वापर संशोधकांनी केला आहे.

तापमान, आर्द्रता आणि लोकसंख्येशी साम्य साधणाऱ्या जगाच्या पूर्व भागातील पाच शहरांची तुलनात्मक अभ्यासाठी निवड करण्यात आली होती. देशातील सुमारे 27 शहरे विदेशातील शहरांतील कोरोना प्रसाराच्या वेगाशी साम्य दाखवतात. म्हणजे सारखेच तापमान, आर्द्रता आणि लोकसंख्या असलेल्या या देशांमध्ये प्रसाराचा वेग समान आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

पुणे शहरातील कोविड प्रसाराच्या वेगाशी साम्य असलेली शहरे :
(रकाण्यातील संख्या पुण्यातील प्रसाराच्या वेगाशी झालेली फारकत दर्शवते.) 

शहराचे नाव मार्च एप्रिल 
जोहान्सबर्ग 0.043 -0.3259 
कराची 0.4616 0.3092 
लाहोर 0.5431 0.2473 
पर्थ उणे 0.2298 उणे 0.0662 
वुहान 0.4014 उणे 0.01

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com