प्रदूषण घटले असले तरी `याचा` धोका मात्र कायम...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 June 2020

देशातील दिल्ली, मुंबई, पुणे आदी मोठ्या शहरातील पी. एम. २.५ आणि पी. एम.१० अशा आकाराच्या प्रदूषकांचे प्रमाण लॉकडाउनच्या काळात जवळजवळ निम्म्याने घटले आहे. असे जरी असले तरी, काही शहरात ओझोनचा थर वाढला आहे.

पुणे : देशातील पर्यावरण संवर्धनासाठी आजवर अनेक आंदोलने, चर्चासत्रे आणि परिषदा झाल्या. जनजागृतीसाठी असलेला हा आरडाओरडा खूप झाला, आता प्रत्यक्ष धोरणात्मक प्रकल्पांची अंमलबजावणी हवी, असा आग्रह पर्यावरण तज्ज्ञांकडून धरण्यात आला आहे. वातावरण, अनुभव शिक्षा केंद्र आदी संस्थांच्या वतीने पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर 'साल भर ६०' या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. लॉकडाउनमध्ये सुधारलेली प्रदूषणाची पातळी पुढील काळातही कशी शाश्वत ठेवता येईल, यासंबंधीची मांडणी यात झाली. वेबिनारला राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमासंबंधीच्या समितीचे सदस्य डॉ. एस. एन. त्रिपाठी, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहयोगी संचालक डॉ. व्ही. एन. मोठगरे, पर्यावरण तज्ज्ञ माधव पै, विनम्रता बोरवणकर आदी उपस्थित होते.

...म्हणून भक्कम दिसणारी झाडे पावसाळ्यात पडतात उन्मळून

लॉकडाउन सारखी उत्तम पर्यावरणीयस्थिती पुढील काळात टिकवायची असेल तर, शाश्वत निर्णयांची अमंलबजावणी करावी लागेल. तसेच पर्यावरणाच्या संवर्धनासंबंधीचे छोटेमोठे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर हाती घ्यावे लागतील. अशी अपेक्षा पै यांनी व्यक्त केली. महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांशी सहकार्य करून योजना पूर्णत्वास न्यावे लागेल असे सांगताना पै म्हणाले, "तंत्रज्ञानाचा वापर करून प्रदूषणाला प्रतिबंध करणाऱ्या गोष्टींचा वापर वाढवावा लागेल. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक व्हेईलक, सार्वजनिक वाहतूक आदींवर भर द्यावा लागेल. हे करत असतानाच सामान्यांना परवडेल अशा किमतीत हे तंत्रज्ञान उपलब्ध करून घ्यावे. त्यासाठी आर्थिक साहाय्य पुरविण्याची तयारी ही करायला हवी." पै यांनी सुरत शहरात अमलात आणलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

 पुण्यातील काही उद्याने उघडली; पण...

वेबिनारच्या सुरवातीला डॉ. त्रिपाठी यांनी लॉकडाउनच्या काळात हवेतील कारक घटकांसंबंधीचे संशोधन मांडले. ते म्हणाले, "देशातील दिल्ली, मुंबई, पुणे आदी मोठ्या शहरातील पी. एम. २.५ आणि पी. एम.१० अशा आकाराच्या प्रदूषकांचे प्रमाण लॉकडाउनच्या काळात जवळजवळ निम्म्याने घटले आहे. असे जरी असले तरी, काही शहरात ओझोनचा थर वाढला आहे. केवळ वाहनांतून उत्सर्जित होणाऱ्या वायूंवर ओझोनचे कमी जास्त होणे अवलंबून नाही. तर त्यासाठी इतर कारक घटकांवर संशोधन होणे गरजेचे आहे." लॉकडाउनचा हा कालावधी देशातील प्रदूषणासंबंधी संशोधनासाठी महत्वपूर्ण असल्याचेही डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले. डॉ. मोठगरे यांनी राज्य प्रदूषण मंडळाच्या कार्यसंबंधीची माहिती यावेळी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनमध्ये सापडेल शाश्वत पर्यावरणाचे तंत्र  

कोरोनामुळे लॉकडाउनची स्थिती आहे. याकाळात मानवी हालचालींना मर्यादा आल्यामुळे प्रदूषणात घट झाली आहे. भविष्यात पर्यावरणाची उत्तम स्थिती कायम ठेवायची असेल तर घरामध्ये कमीत कमी कचऱ्याची निर्मिती, तसेच हॉटेल्स, उद्योग आणि व्यवसायांनी कचरा आणि प्रदूषकांच्या विल्हेवाटी संदर्भात शाश्वत धोरण विकसित करावे. लॉकडाउनमध्ये हा बदल करणे शक्य आहे, असे डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The risk of ozone persists even as pollution decreases