हडपसरमध्ये माळीणची पुनरावृत्ती होण्याचा धोका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

हडपसर- तुकाई टेकडीवर मोठया प्रमाणात अनाधिकृत राडारोडा टाकला जात आहे. त्यामुळे टेकडीवर मोठं मोठे ढिगारे तयार झाले असून टेकडीच्या पायथ्याशी शेकडो रहिवाश्याच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. माळीण घटनेने संपूर्ण देश हादरला असताना पुन्हा एकदा माळीण ची पुनरावृत्ती होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे, प्रशासन मात्र डोळे झाकून बसल्याने नागरिक संतप्त आहेत. तुकाई टेकडीवर वाढते अतिक्रमण व राडारोडा टाकणाऱ्यावर कारवाई करून टेकडी राडारोडा मुक्त करण्याची मागणी स्थानिक रहिवाशी व नगरसेवक योगेश ससाणे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

हडपसर परिसरात तुकाई दर्शन येथे तुकाई टेकडीच्या पायथ्याला नगरसेवक योगेश ससाणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र टेकडीवर दिवसेंदिवस राडारोडा टाकला जात असल्याने राडारोड्याचे मोठे ढिगारे निर्माण झालेले चित्र दिसून आले. टेकडी राडारोड्याने भरली असल्याने नागरिकांना चालायला जागा शिल्लक उरली नाही. टेकडीवर अनेकांनी शेड मारून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे टेकडीचे महत्व नाहीसे झाले असून टेकडीला मोकळा श्वास उरला नाही. टेकडीचे संरक्षण व त्यावर झाडे लावायचा संकल्प पालिकेने केला असला तरी पालिकेचे अधिकारी याकडे पध्दतशिरपणे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. यामध्ये अधिकाऱ्यांवर अर्थपूर्ण असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे, पावसाळ्यात टेकडीवरील माती व राडारोडा वाहून खाली येण्याचे प्रकार अनेक वर्षापासून येथे होत आहे. त्यामुळे यावर्षी हवामान खात्याने मुसळधार पावसाचे संकेत दिले असल्याने माळीण सारखी दुर्घटना येथे होऊ शकते हे नाकारता येत नसल्याचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी सांगितले आहे. येथे रोज सकळी व सायंकाळी जेष्ठ नागरिक, महिला या ठिकाणी वॉकिंग साठी येतात. रस्त्यात राडारोडा टाकला असल्याने चालणे मुश्किल झाले असल्याने येथील राडारोडा व अतिक्रमणे काढून टाकण्याची मागणी स्थानिक रहिवाश्यांनी केली आहे.

नगरसेवक योगेश ससाणे म्हणाले, टेकडीवरील शेकडो डंपर राडारोडा टाकला जात आहे. त्यामुळे संपूर्ण टेकडीला राडारोडा व अतिक्रमणाचा विळखा वाढत चालला आहे. टेकडीच्या पायथ्याला शेकडो रहिवाश्यांच्या जीवाला धोका संभवतो, माळीण गावात झालेल्या दुर्घटनेसारखी दुर्घटना होणे नाकारता येत नाही. त्यामुळे टेकडीवर धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. वेळीच उपाययोजना केल्या नाही तरी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. याबाबत पालिका आयुक्ताची भेट घेऊन त्यांना यावर कारवाई करण्याबाबत लेखी निवेदन दिले आहे. 

Web Title: The risk of repetition of the melin incident in Hadapsar