जलपूजनाची आरती...प्रदूषणाची भरती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

कॅरिबॅग व प्लॅस्टिक वस्तू वापरणारे, विक्रेते, साठा करणारे व पुरवठादारांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, खुद्द महापालिकेतर्फे चिंचवडमध्ये गुरुवारी (ता. १९) आयोजित भूमिपूजन कार्यक्रमात कॅरिबॅगचा वापर झाला. त्यामुळे न्याय मागायचा कोणाकडे? आणि दंड आकारायचा कोणाकडून? असा प्रश्‍न निर्माण झाला.

पिंपरी - कॅरिबॅग व प्लॅस्टिक वस्तू वापरणारे, विक्रेते, साठा करणारे व पुरवठादारांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, खुद्द महापालिकेतर्फे चिंचवडमध्ये गुरुवारी (ता. १९) आयोजित भूमिपूजन कार्यक्रमात कॅरिबॅगचा वापर झाला. त्यामुळे न्याय मागायचा कोणाकडे? आणि दंड आकारायचा कोणाकडून? असा प्रश्‍न निर्माण झाला.

महापालिकेतर्फे पवना नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदी सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन चिंचवड येथील गणेश विसर्जन घाटावर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, नगरसेवक राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, नगरसेविका अपर्णा डोके, झामाबाई बारणे यांच्या हस्ते झाले. सहशहर अभियंता मकरंद निकम, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी गुलाल, कुंकू, हळद, रांगोळी, फुले व इतर पूजा साहित्य चक्क कॅरिबॅगमधून आणले होते. पदाधिकाऱ्यांसाठी केलेल्या बैठक व्यवस्थेजवळच कॅरिबॅग ठेवली होती. 

आम्ही नाही सुधारणार
नदी सुधार कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यानच्या अर्ध्या तासात सामान्य नागरिकांकडूनही नदी प्रदूषित करण्याचे प्रसंग बघायला मिळाले. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पितृपक्षातील श्राद्धाचा नैवेद्य घेऊन पाठोपाठ दोन जण घाटावर आले. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांवरून कॅरिबॅगसह नैवेद्य नदीत सोडला. पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी हटकल्यानंतर एकाने कॅरिबॅग काढून शेजारील कुंडात टाकली. मात्र, दुसरी व्यक्ती दुर्लक्ष करून निघून गेली.

त्यानंतर आलेल्या तरुणाने डब्ब्यातून नैवेद्य काढून, तर दुसऱ्याने कापडी पिशवीसह नैवेद्य नदीत सोडला. त्यांना कुणीही हटकले नाही. दुचाकीवर आलेले दांपत्य निर्माल्याची कॅरिबॅग नजीकच्या पुलावरूनच नदीत टाकण्याच्या तयारीत होते. पण, घाटावरील कार्यक्रमाची तयारी पाहून नैवेद्य न टाकताच ते निघून गेले. काही क्षणात तिघे जण मूर्ती विसर्जनासाठी आले. सुरक्षा रक्षक व कार्यकर्त्यांनी त्यांना मोरया घाटावर जाण्यास सांगितले.

भूमिपूजनासाठी हळद, कुंकू, गुलालही प्लॅस्टिक पिशव्यांमधूनच आणलेला होता. कार्यक्रमानंतर सर्व पिशव्या व कॅरिबॅग घाटावरच पडून होती.  

व्यापाऱ्यांकडून दोन लाख वसूल
महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्लॅस्टिक वापरप्रकरणी गेल्या आठवड्यात ४० व्यावसायिकांकडून दोन लाख रुपये दंड वसूल केला. कारवाईस विरोध केल्याने बेल्जियम वाफेल्स या व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला. कारवाईत ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पिंपळे सौदागर परिसरातील २६ दुकानदारांकडून एक लाख ३० हजार, ‘अ’ व ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांनी प्रत्येकी पाचप्रमाणे दहा व्यावसायिकांकडून ५० हजार आणि ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाने चार व्यावसायिकांकडून २० हजार रुपये दंड वसूल केला. अद्याप कारवाई चालूच आहे. मग, महापालिकेच्या कार्यक्रमात कॅरिबॅग वापरल्याप्रकरणी कारवाई कोण? व कोणावर करणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

इंद्रायणी नदीचे जलपूजन
पिंपरी - इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेतर्फे नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी विविध संस्थांच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोशी घाटावर जलपूजन करून सामूहिक आरती केली. आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. 

महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षा यशोदा बोईनवाड, सुवर्णा बुर्डे, योगिता नागरगोजे, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांच्यासह अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्टस फाउंडेशन, इंद्रायणी जलपर्णीमुक्त अभियान, सीएचयू ग्रुप, गंधर्वनगरी वृक्षमित्र, चिखली-मोशी हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच पुणे-नाशिक महामार्गाच्या भोसरीतील राजमाता उड्डाण पुलाखाली व सेवा रस्ते ‘अर्बन स्ट्रीट डिझाईन’नुसार विकसित केले जाणार आहेत. त्याचे भूमिपूजनही लांडगे यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: River Improvement Project Land worship Pollution