'असून अडचण, नसून खोळंबा'; किरकटवाडीतील रस्त्यावरून वाहतंय ओढ्यासारखं पाणी

Kirkitwadi_Road
Kirkitwadi_Road

किरकटवाडी (पुणे) : अनेक वर्षापासून रखडलेले काम, मोठमोठे खड्डे, चिखल, जागोजागी असलेले अतिक्रमण आणि पाऊस सुरू असताना येणारे ओढ्याचे स्वरूप यामुळे किरकटवाडी-खडकवासला या दोन गावांच्यामधे असलेला शिव रस्ता म्हणजे 'असून अडचण आणि नसून खोळंबा' याची प्रचिती या रस्त्याने प्रवास करणाऱ्या दोन्ही गावातील नागरिकांना येत आहे.

किरकटवाडी गावाच्या हद्दीतील शिवनगर परिसर आणि खडकवासला गावाच्या हद्दीतील कोल्हेवाडी परिसर संपूर्णपणे या शिव रस्त्यावर अवलंबून आहे. सुमारे पाच ते सहा हजार लोकवस्तीसाठी हा एकमेव रस्ता आहे. मात्र रस्त्याची एवढी दुरावस्था झालेली आहे की नागरिकांना चालणे कठीण होत आहे. डोंगरापासून वाहत येणारे पाणी या शिव रस्त्यावरून थेट मुख्य सिंहगड रस्त्यापर्यंत येते. पावसाचे पाणी जाण्यासाठी कोणतीही सोय नसल्याने या रस्त्याला अक्षरशः ओढ्याचे स्वरूप येत आहे. पाण्याबरोबर वाहत येणारा चिखल रस्त्यावर साचत असल्याने पायी चालणे कठीण होत आहे. वृद्ध,अपंग, लहान मुले यांना या रस्त्यावरून चालणे अशक्य होत आहे.

मागील काही वर्षांमध्ये या परिसरामध्ये लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढत गेली. सध्याही मोठमोठे बांधकाम प्रकल्प या भागात सुरू आहेत. लोकवस्ती वाढल्यामुळे या शिव रस्त्यावरील वाहतुकीचा तानही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रस्ता अरुंद असल्याने अनेकवेळा वाहतूक कोंडीचे प्रसंग निर्माण होतात. नागरिकांना पर्याय उपलब्ध नसल्याने अशा अत्यंत खराब झालेल्या रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

काही ठिकाणी टप्प्याटप्प्याने या रस्त्याचे काम करण्याचा प्रयत्न यापूर्वी झालेला आहे. परंतु जागोजागी असलेले अतिक्रमण व प्रशासनाची मवाळ भूमिका यामुळे झालेले कामही खराब होऊन गेले आहे. तसेच प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधींनीही या रस्त्याच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि रस्त्याच्या समस्येतून सुटका करावी, अशी मागणी या रस्त्यावर अवलंबून असलेले नागरिक करत आहेत.

"ज्या ठिकाणी नागरिक विरोध करत आहेत त्यांच्याशी प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी एकत्रित चर्चा करून मार्ग काढणे आवश्यक आहे. रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशीही या रस्त्याबाबत अनेक वेळा चर्चा केलेली आहे."
- सौरभ मते, सरपंच ,खडकवासला.

"किरकटवाडी गावच्या हद्दीत असलेले रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी संबंधित नागरिकांशी बोलून त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत. नांदोशी गावच्या सीमेपर्यंत या शिव रस्त्याची मोजणी करताना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर मी स्वतःही उपस्थित होतो. 2020-21 च्या नियोजनामध्ये हा रस्ता घेतला असल्याचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून समजले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी लवकर काम व्हावे यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे."
- गोकुळ करंजावणे, सरपंच, किरकटवाडी.

"पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून किरकटवाडी - खडकवासला या दोन्ही गावांच्या शिव रस्त्याची नांदोशी गावच्या हद्दीपर्यंत मोजणी करण्यात आली होती; परंतु सद्यस्थितीत त्यावर पुढे काहीही झालेले नाही. जिल्हा परिषदेकडून संबंधित रस्त्याच्या कामाबाबत ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच तो रस्ता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित होईल. तोपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती व देखभाल ही जिल्हा परिषदेकडेच असेल."
- राजेंद्र लोखंडे, उपअभियंता, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com