उंचसखल ब्लॉक, खड्डेच खड्डे चोहीकडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

पिंपरी - उंचसखल सिमेंटचे ब्लॉक, रस्त्यावरील खड्डे, वाहनांची वाढती संख्या आणि बेशिस्त वाहनचालक यामुळे चिंचवड येथील चापेकर चौकातून नागरिकांना प्रवास करणे नागरिकांना दिवसेंदिवस जिकिरीचे होत आहे. 

पिंपरी - उंचसखल सिमेंटचे ब्लॉक, रस्त्यावरील खड्डे, वाहनांची वाढती संख्या आणि बेशिस्त वाहनचालक यामुळे चिंचवड येथील चापेकर चौकातून नागरिकांना प्रवास करणे नागरिकांना दिवसेंदिवस जिकिरीचे होत आहे. 

चापेकर चौकातून चिंचवड स्टेशन, बिजलीनगर, दळवीनगर, गांधीपेठ, वाल्हेकरवाडी, भोईरआळी, थेरगाव असे सात रस्ते जातात. या चौकात कोंडी होऊ लागल्याने महापालिकेने काही वर्षांपूर्वी पूलही बांधला. या चौकात सर्वत्र सिमेंटचे ब्लॉक बसविले आहेत. जोराचा पाऊस आला की चापेकर चौकातील खड्ड्यांमध्ये आणि सखल भागातही पाणी साचते. चौक मोठा असल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही मुश्‍कील होते. विशेषत: महिला, ज्येष्ठांची गैरसोय होते. 

लिंक रस्त्यावर विशाल कॉर्नर अपार्टमेंटलगत सुमारे १५ दिवसांपूर्वी महावितरण कंपनीच्या वतीने खोदकाम केले. परंतु खोदकाम केलेला भाग योग्यरित्या बुजविलेला नाही. सिमेंटचे ब्लॉक व्यवस्थित लावले नाहीत. त्यामुळे येथून पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. उंचसखल ब्लॉकमुळे एखादा नागरिक पडून जखमी होण्याचा धोका संभवतो.

थेरगावहून चिंचवडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणाच्या परिसरात खड्डे आहेत. वाल्हेकरवाडीकडून चिंचवड उड्डाण पुलाकडे जाणाऱ्या मार्गाच्या वळणावर सखल भाग आहे. त्यामुळे तेथे पावसाचे पाणी साचते.

वाल्हेकरवाडीकडून फत्तेचंद शाळेकडे जाणाऱ्या मार्गाच्या वळणावरच रस्ता खचून त्यात पाणी साचले आहे. तेथे सकाळी दुचाकीस्वार पडून त्याच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याचे स्थानिकांनी  सांगितले. वाल्हेकरवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर संत नामदेव महाराज चौकातही खड्डे आहेत. येथील पदपथांवर अतिक्रमण करून टेम्पोचालक त्यांचे टेम्पो दिवसभर उभे करतात. परंतु त्यांच्यावर कारवाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसते.

महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी थेरगावहून चिंचवडकडे वळतानाच्या मार्गावर जलवाहिनी टाकली. तेव्हा काही खड्ड्यांची दुरुस्ती केली, पण काहींची केली नाही. पावसाळ्यापूर्वी ही दुरुस्ती करणे अपेक्षित होते. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचते.
- संजयकुमार, नागरिक, चिंचवड

महापालिकेने महिन्याभरापूर्वी केबलच्या कामासाठी खोदकाम केले. त्यानंतर खडी आणि थोडेसे डांबर टाकून खोदकाम केलेला भाग बुजविला. परंतु त्यानंतर पावसामुळे डांबर गायब झाले असून खडी उरली आहे. चौकातील खड्ड्यांमध्ये पाणी साचून ते वाहनचालकांच्या आणि पादचाऱ्यांच्या अंगावर उडते. खड्डे पडलेल्या ठिकाणी पुन्हा सिमेंटचे ब्लॉक बसविण्यात येत नाहीत.
- राजेंद्र बुटाला, व्यावसायिक, चिंचवड

खड्डे पडलेल्या रस्त्यांची शनिवारी (ता. ७) दुरुस्ती करण्यात येणार होती. परंतु पावसामुळे होऊ शकली नाही. सोमवारपर्यंत (ता. ९) दुरुस्ती करण्यात येईल.
- प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता, ‘ब’ प्रभाग महापालिका

Web Title: road hole cement block