खड्ड्यांत हरविले रस्ते

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

महत्त्वाचे खड्डेमय रस्ते

  • पुणे- मुंबई महामार्ग सेवा रस्ता (मुंबईकडे) : कासारवाडी, प्राधिकरण पोलिस चौकी, भक्तिशक्ती चौक
  • पुणे- मुंबई महामार्ग सेवा रस्ता (पुण्याकडे) : पीएमपी बस टर्मिनल्स, भक्तिशक्ती चौक, चर्चसमोर, एम्पायर स्क्वेअर सोसायटी कॉर्नर ते सेंट्रल मॉल, मोरवाडी चौक, खराळवाडी
  • राजे शिवछत्रपती चौक (वखार महामंडळ) ते वडमुखवाडी रस्ता : रविकिरण सोसायटी, अलंकापुरम सोसायटी
  • देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग : पुनावळे भुयारी मार्ग, ताथवडे पवारवस्ती भुयारी मार्ग
  • वाल्हेकरवाडी ते रावेत रस्ता : रस्ता रुंदीकरण रखडले असून मोठमोठे खड्डे पडले आहेत
  • आकुर्डी ते थरमॅक्‍स चौक रस्ता : खंडोबा माळ चौकात रस्त्याचे खोदकाम
  • चिखली- मोशी शीव रस्ता : नवीन रस्त्याची उभारणी, एक बाजू दोन महिन्यांपासून अपूर्ण
  • चिंचवड स्टेशन ते डांगे चौक रस्ता : चापेकर चौक पेव्हिंग ब्लॉक उखळले
  • चिखली : म्हेत्रेवस्ती, सानेवस्तीतील टॉवर लाइनखालील रस्त्यावर खड्ड्यांचे जाळे
  • निगडी- तळवडे रस्ता : रुपीनगर कॉर्नर, त्रिवेणीनगर भाग 

पिंपरी - सततचा पाऊस आणि तात्पुरत्या डागडुजीमुळे शहरातील महामार्गांसह अंतर्गत बहुतांश रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यांची दुरुस्ती व डांबरीकरणासाठी आठ दिवसांपूर्वी आठ दिवसांत झालेल्या तीन स्थायी समिती सभांमध्ये सुमारे ६८ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. अद्याप प्रत्यक्ष कामांना सुरवात झालेली नसल्याने खड्ड्यांमधूनच वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

जुलैच्या शेवटच्या व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांना पूर आला होता. निवासी भागात पाणी शिरले होते. तेथील रस्त्यांसह पुणे- मुंबई, देहूरोड- कात्रज (मुंबई- बंगळूर) महामार्ग आणि अंतर्गत मुख्य रस्त्यांवर खड्डे पडून त्यांची चाळण झाली. दगड, विटांचे तुकटे, मुरूम टाकून, तर काही भागात डांबरयुक्त खडी टाकून तात्पुरती डागडुजी करण्यात आली. मात्र, पावसाची संततधार सुरूच राहिल्यामुळे रस्त्यांची दुरवस्था कायम राहिली. त्यातील काही रस्त्यांचे हॉटमिक्‍स पद्धतीने डांबरीकरण करणे व काही रस्त्यांवर पेव्हिंग ब्लॉक टाकण्याच्या कामांना चार सप्टेंबरच्या स्थायी समिती सभेने सुमारे ४० कोटी रुपयांच्या ८० कामांना मंजुरी दिली. दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्याच्या पार्श्‍वभूमीवर नऊ सप्टेंबरला विशेष सभा घेऊन व ११ सप्टेंबरच्या नियमित सभेत आणखी काही रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली. मात्र, कामांना प्रत्यक्ष सुरवात झालेली नसल्याने वाहनचालकांना खड्ड्यांमधूनच वाट काढावी लागत आहे.

‘स्थायी’ची आज विशेष सभा
महापालिका स्थायी समितीची सोमवारी (ता. १६) आणखी एक विशेष सभा आयोजित केली आहे. त्यात बहुतांश रस्त्यांची डांबरीकरणासह वेगवेगळी कामे केली जाणार आहेत. त्यासाठीचे ८४ कोटी रुपये खर्चाचे २७ विषय मंजुरीसाठी आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road Hole Municipal Rain Water