डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली खुबी ते माळशेज घाट रस्त्याबाबत महत्वाची माहिती

रवींद्र पाटे
Thursday, 21 January 2021

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले कल्याण-नगर रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत करण्यात आले होते.

नारायणगाव : खुबी येथील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते यांच्या तक्रारीची दखल घेऊन मुंबई-विशाखापट्टणम् राष्ट्रीय महामार्गाचा भाग असलेल्या कल्याण-नगर महामार्गावरील खुबी ते माळशेज घाट दरम्यानच्या चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे, अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

पुणे: गाडीला दगड मारला म्हणून त्यानं डोक्‍यातच दगड घातला​

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले कल्याण-नगर रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत करण्यात आले होते. या रस्त्यावरील खुबी ते माळशेज घाट या चार किमी लांबीच्या रस्त्यावर ठिक ठिकाणी मोठे-मोठे खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली होती. या मुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला होता. ग्रामपंचायत खुबी व मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती.

या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रफुल्ल दिवाण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत औटी यांच्याशी संपर्क साधून रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची सूचना केली होती.

सिरमच्या लसीचा वाद कोर्टात; 'कोव्हिशिल्ड'बाबत कंपनीचे स्पष्टीकरण​

दरम्यान, त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम (राष्ट्रीय महामार्ग) विभाग यांनी तातडीने दखल घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीचे काम  सुरू केले आहे. डॉ. कोल्हे यांच्या तत्परतेबद्दल खुबी ग्रामस्थांनी व पाटे यांनी समाधान व्यक्त केले आहे.  

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: road repair work between khubi to malshejghat started says mp dr amol kolhe