रस्त्यांच्या प्राधान्यक्रमात बदल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

शेटफळगढे - उर्वरित राहिलेल्या एक वर्षाच्या कालावधीत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जास्तीतजास्त गावे व वाड्यांना पक्‍क्‍या डांबरी रस्त्यांनी जोडण्यासाठी २०१९-२० या वर्षात या योजनेतून हाती घेण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या प्राधान्यक्रमात बदल केला आहे. यानुसार आता छोट्या छोट्या रस्त्यांना (लिंक रूट) प्राधान्य दिले जाणार आहे.  

शेटफळगढे - उर्वरित राहिलेल्या एक वर्षाच्या कालावधीत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जास्तीतजास्त गावे व वाड्यांना पक्‍क्‍या डांबरी रस्त्यांनी जोडण्यासाठी २०१९-२० या वर्षात या योजनेतून हाती घेण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या प्राधान्यक्रमात बदल केला आहे. यानुसार आता छोट्या छोट्या रस्त्यांना (लिंक रूट) प्राधान्य दिले जाणार आहे.  

यापूर्वी या योजनेअंतर्गत रस्त्यांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्याकरिता सरकारने १ डिसेंबर २०१५ नुसार लोकसंख्या व इतर बाबींच्या आधारे गुणांकन पद्धत निश्‍चित केली होती. यानुसार पाच सहा मोठ्या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे थ्रू रूट, दोन किंवा तीन मोठ्या लोकसंख्येच्या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे मेजर रूरल लिंक रोड आणि दोन किलोमीटरपेक्षा कमी अंतर असलेल्या छोट्या एक किंवा दोन वस्त्या किंवा गावे यांना जोडणारे रस्ते लिंक रूट अशा क्रमाने रस्त्याच्या निवडीसाठी प्राधान्यक्रमांचे वर्गीकरण निश्‍चित केले होते. मात्र, आता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत राज्यास रस्त्यांच्या लांबीचे नवीन उद्दिष्टांचे वाटप लवकरच केले जाणार आहे. याअंतर्गत राज्याच्या ग्रामीण भागातील पाच ते सहा गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची अर्थात थ्रू रूट रस्त्यांची प्राधान्याने निवड होण्याची शक्‍यता आहे.

याशिवाय २०१५-१६ ते २०१८-१९ या चार वर्षांच्या काळात या योजनेअंतर्गत प्रामुख्याने थ्रू रूट आणि मेजर रूरल लिंक रोडची यांची निवड होऊन आतापर्यंत सर्वाधिक कामेही झालेली आहेत. त्यामुळे उरलेल्या एक वर्षाच्या कालावधीत अशी गावे वस्त्या पक्‍क्‍या डांबरी रस्त्यांनी जोडण्यासाठी या योजनेतून रस्त्याची कामे हाती घेण्याकरिता रस्त्याचा प्राधान्यक्रम बदलण्याची आवश्‍यकता होती. यानुसार १२ जूनच्या ग्रामविकास विभागाच्या सरकारी निर्णयाच्या आधारे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत २०१९-२० या वर्षातील रस्त्याच्या निवडीचा पूर्वीचा प्राधान्यक्रम बदलला आहे. या निर्णयानुसार आता प्राधान्याने अनुक्रमे छोटे रस्ते अर्थात लिंक रोड त्यानंतर दोन किंवा तीन मोठ्या गावांना जोडणारे मेजर लिंक रूट आणि त्यानंतर पाच सहा गावांना जोडणाऱ्या थ्रू रूट असा प्राधान्यक्रम निश्‍चित केला आहे. याबाबतच्या प्राधान्यक्रमांचे आदेश या योजनेचे कामकाज पाहणाऱ्या कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता यांना सरकारने दिला आहे.

Web Title: road work priority