रखडलेल्या रस्त्याचे काम होणार पूर्ण: प्राधिकरणाकडुन नागरिकांना नोटिस

ज्ञानेश्वर भंडारे
गुरुवार, 24 मे 2018

वाल्हेकरवाडी (पुणे) - चिंचवड-रावेत या 34.5 मीटर रस्त्याच्या अर्धवट अवस्थेतील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचा ताबा घेण्याकरिता अडथळा ठरत असलेल्या घरांना प्राधिकरणाच्या वतीने अंतिम नोटिसा बजावीत, घरे खाली करण्यास सागितले आहे. घरांवरती अंतिम लाल रेषांचे मार्किंग करण्यात आले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण यांच्या वादात भूसंपादन अभावी रावेत ते चिंचवड जुना जकात नाका या सहा पदरी मार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाणा पासून ते ओढ्या पर्यंतचे काम अर्धवट अवस्थेत आहे.

वाल्हेकरवाडी (पुणे) - चिंचवड-रावेत या 34.5 मीटर रस्त्याच्या अर्धवट अवस्थेतील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचा ताबा घेण्याकरिता अडथळा ठरत असलेल्या घरांना प्राधिकरणाच्या वतीने अंतिम नोटिसा बजावीत, घरे खाली करण्यास सागितले आहे. घरांवरती अंतिम लाल रेषांचे मार्किंग करण्यात आले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण यांच्या वादात भूसंपादन अभावी रावेत ते चिंचवड जुना जकात नाका या सहा पदरी मार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाणा पासून ते ओढ्या पर्यंतचे काम अर्धवट अवस्थेत आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणाने कंबर कसली असून, त्याकरिता आवश्यक असणाऱ्या जागेचे भूसंपादन करण्यासाठी आज वाल्हेकर वाडी येथील 60 व्यावसायिक बांधकामांना प्राधिकरणाने खाली करण्याच्या अंतिम नोटीस बजावल्या आहेत. 

यामध्ये 5-6 पक्की घरे आणि 54 व्यावसायिक  स्वरूपातील बांधकामे काढून टाकण्यात येणार आहेत. जकात नाका ते रावेत हा रस्ता वाल्हेकरवाडी मधून जात असून, या रस्त्याचे काम आजही अपूर्णच आहे. हा रस्ता चिंचवड जुना जकात नाका येथून सुरवात होऊन पुढे औन्धमार्गे येणारा बिआरटी रस्ता रावेत येथे मिळतो. पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या लोकांसाठी हा एक चांगला मधला मार्ग असून, या रस्त्यामुळे प्रवाश्यांचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचते. पण या रस्त्याचे काम असे अर्धवट अवस्थेत आहे. नवनगर विकास प्राधिकरणातील हद्दीतील रस्त्याच्या कामाला सुरवात होवून ३१ डिसेंबर २०१४ रोजी ते पूर्ण झाले आहे. तेथून पुढील रस्त्यासाठी आवश्यक असणारे भूसंपादन महापालिके कडून न झाल्या मुळे अजूनही हा रस्ता वापरात नाही. या रस्त्याचा पूर्ण खर्च महानगरपालिका करणार होती. परंतु, त्याची काहीं हद्द प्राधिकरणाच्या हद्दीत येत असल्यामुळे हा रस्ता प्राधिकरणाकडे सोपविण्यात आला. 

या रस्त्याची पूर्ण लांबी ३.१५ किमी व रुंदी ३४.५ मी. आहे. प्राधिकरणाच्या हद्दीतील २.६३ किमी लांबी आणि पूल बांधून पूर्ण झाले असून, महानगरपालिकेच्या हद्दीतील वाल्हेकरवाडी येथील सुमारे २०० मीटर पेक्षा जास्त जागेच्या भूसंपादनाचे काम अपूर्ण राहिले आहे. रस्त्यासाठी जवळपास ३७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आतापर्यंत सुमारे १७ ते १८ कोटी रुपये खर्च झाला आहे. प्राधिकरणाच्या हद्दीतील रस्ता पूर्ण झाला असून, तो वापरण्यायोग्य आहे असेही जाहीर करण्यात आले आहे. विकास आराखड्यानुसार रावेत ते चिंचवड जकात नाका मार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाण ते नाल्यापर्यंतचा भाग नवनगर प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो. तेथील भूसंपादन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात येणार असून, महापालिका रस्त्याच्या अर्धवट अवस्थेतील काम करणार आहे.

कारवाई अटळ 
रस्त्याच्या कामासाठी भूसंपादन करण्यात येणार असून, 23 मे रोजी अंतिम नोटीस देण्यात आलेल्या आहेत. पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात येणार असून, त्यानंतर या कामासाठी आवश्यक असणारा निधी प्राधिकरण महापालिकेला हस्तांतरित केला जाणार आहे. त्यानंतर या कामाची निविदा काढण्यात येणार आहे. दोन महिन्यात प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

महापालिका हद्दीतील रस्त्याचे काम प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आले आहे, रस्त्यात अतिक्रमण करून बांधकाम केलेल्या नागरिकांना नोटीसा बजावल्या आहेत. 2- 3 दिवसांत पोलिस बंदोबस्त मिळाला की अतिक्रमण कारवाई करण्यात येईल. 
अनिल दुधालवर, उपअभियंता प्राधिकरण

Web Title: Road work will be completed: Notice to citizens by authority