बालेवाडीतील रस्ते  पावसामुळे जलमय 

BALEWADI.jpeg
BALEWADI.jpeg

पुणे ः बाणेर रस्त्यामार्गे बालेवाडी गावाकडे जाताना ईरा बेकरी व शिवनेरी पार्क या सोसायटीजवळ 
मागील चार दिवस सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे एखाद्या जलाशयाचे रूप आले आहे. परिसरातील सोसायट्यांच्या पार्किंगमध्येही पाणी शिरले आहे. जलमय रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहनचालकांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. येथील पाण्याचा निचरा होण्यासाठी कायमस्वरूपाची उपाययोजना करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. 

सतत पडणाऱ्या पावसामुळे बालेवाडीतील मुख्य रस्त्यावर गुढघाभर पाणी साठले आहे. या ठिकाणी असणाऱ्या शिवनेरी पार्क सोसायटीजवळ एक छोटा रस्ता असून, येथे एक जाळीचे चेंबर बसविण्यात आले आहे. या चेंबरमधून पाणी पुढे वाहून जाण्यासाठी मार्गच नसल्याने त्यातूनच पाणी बाहेर पडून मुख्य रस्त्यावर वाहत आहे. बालेवाडीतील इतर ठिकाणाहून हे पाणी येथे वाहत येते. या रस्त्यावर थोड्या अंतरावरील असलेले दुसरे चेंबरही खचले आहे. 

स्मार्ट सिटी अंतर्गत बालेवाडी येथे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे, पण हे करत असताना पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही, तसेच पदपथही बांधण्यात आला नाहीत. काही ठिकाणी तर काम अर्धवट स्थितीत सोडून त्या पुढचे काम केले आहे. त्यामुळे या ठिकाणी खोलगट भाग तयार झाल्याने इतर भागातील पाणी येथे साठून राहते. परिसरातील काही सोसायट्यांच्या पार्किंगमध्येही पाणी घुसले आहे. त्यामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहून युद्ध पातळीवर काम करत आहेत, पण अजूनही यावर ठोस उपाय योजना झालेली नाही. या समस्येवर कायमचा तोडगा काढावा, अशी नागरिकांची मागणी आहे. 

विकास आराखड्यानुसार बालेवाडीचा मुख्य रस्ता 24 मीटरचा आहे, पण स्थानिक नागरिकांनी काही ठिकाणी जागा ताब्यात न दिल्याने हा रस्ता फक्त 15 मीटरचा तयार करण्यात आला. काही ठिकाणी जागेचा ताबा न मिळाल्याने काम अपूर्ण राहिले आहे. मागील दोन वर्षांपासून हा वाद सुरू आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठीची वाहिनी तसेच पदपथ बनवता आला नाही. येथील अपूर्ण कामामुळे पाणी साठून राहते. पाण्याचा निचरा करण्यासाठी पथ विभागाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. - दिनकर गोजारे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग, महापालिका 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com