भोसरीतील रस्ते होणार अतिक्रमणमुक्त

पथारी, हातगाडी व्यावसायिकांचे नाट्यगृहाजवळ पुनर्वसन होणार; सपाटीकरण सुरू
भोसरीतील रस्ते होणार अतिक्रमणमुक्त
भोसरीतील रस्ते होणार अतिक्रमणमुक्त sakal

भोसरी : भोसरी परिसरातील पथारीवाले, हातगाडीवाले यांचे कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील मोकळ्या जागेत पुनर्वसन करणार आहे. यासाठी महापालिकेने त्या जागेच्या सपाटी करणाचे काम सुरू केले आहे. त्यामुळे भोसरी परिसरातील चौक अतिक्रमण मुक्त होणार आहे. त्याचप्रमाणे भोसरी-आळंदी रस्ता चौकातील एसटी थांबा, मजूर अड्डाही हलविणार आहे. त्यामुळे रस्त्यावर दिसणाऱ्या नेहमीच्या वर्दळीतून नागरिकांसह वाहन चालकांची सुटका होण्याची आशा निर्माण झाली आहे.

भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली, पीएमटी चौक, पीसीएमटी चौक, आळंदी रस्ता, दिघी रस्ता, पुणे-नाशिक महामार्गाचा सेवा रस्ता, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह परिसर या ठिकाणी पथारीवाले, हातगाडीवाले आदींसह इतर विक्रेत्यांनी महापालिकेच्या पदपथ आणि रस्त्यावर अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथ आणि वाहन चालकांना रस्ता उपलब्ध होत नाही. त्यामुळे येथील रस्त्यावर नेहमीच वाहनांची गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळते. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील, स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे, नगरसेवक संतोष लोंढे, सागर गवळी, प्रियांका बारसे, सोनाली गव्हाणे, भीमाबाई फुगे, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, नगररचना उपसंचालक प्रभाकर नाळे, ‘इ’ क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, भोसरी वाहतूक पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर आदींसह कार्यकारी अभियंत्यांची बैठक झाली. या बैठकीत ही समस्या सोडविण्यासाठी विविध उपाय योजनेसह निर्णय घेतला. कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील मैदानाच्या सपाटीकरणाचे काम सुरू आहे. या मैदानाच्या सपाटीकरणानंतर येथे सिमेंटचा कोबा करणार आहे. या ठिकाणी विक्रेते, ग्राहक, मजूर अड्ड्यावरील कामगार यांच्यासाठी स्वच्छतागृहाबरोबरच पिण्याच्या पाण्याची सोय करून देणार आहे. त्याचप्रमाणे इतरही आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

भोसरीतील रस्ते होणार अतिक्रमणमुक्त
राजीनाम्यानंतर सचिन सावंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, चर्चांना उधाण

अशी सोडविली जाईल समस्या

  • भोसरी-आळंदी रस्ता चौकातील बस थांबा धावडेवस्तीजवळील रस्त्यावर स्थलांतरित केला जाईल.

  • कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळील मजूर अड्डा गावजत्रा मैदानात स्थलांतरित केला जाईल.

  • हातगाडीवाले व पथारीवाले यांचे नाट्यगृहाजवळील मैदानात पुनर्वसन केले जाईल.

  • वाहतूक पोलिसांद्वारे वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरलेल्या वाहनांवर कारवाई केली जाईल.

  • भोसरीतील आळंदी रस्ता व दिघी रस्ता नो पार्किंग झोन करणार.

  • दुकानात आणण्यात येत असलेल्या मालासाठी वेळ निश्चित केली जाईल.

"प्रभाग क्रमांक सातमधील एकूण ४८७ हातगाडीवाले व पथारीवाले यांचे स्थलांतर गावजत्रा मैदानात करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. नोंदणीकृत १२७ हातगाडीवाले व पथारीवाले यांच्यासाठी राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली ओटे किंवा गाळे बांधण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदीस स्थायी समितीद्वारे प्राधान्य देण्यात येईल."

- अॅड. नितीन लांडगे, अध्यक्ष, स्थायी समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com