पुणे मेट्रोसाठी दगड-मातीचे नमुने घ्यायला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जानेवारी 2017

पुणे : शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या अशा मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी माती व दगडाचे नमुने घेण्याचे काम आजपासून (शुक्रवार) सुरू करण्यात आले आहे. याबाबतचा व्हिडिओ पुणे मेट्रो रेल्वेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

पुणे : शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या अशा मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी माती व दगडाचे नमुने घेण्याचे काम आजपासून (शुक्रवार) सुरू करण्यात आले आहे. याबाबतचा व्हिडिओ पुणे मेट्रो रेल्वेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

नगर रोडवरील प्रस्तावित मेट्रो मार्गावरून माती आणि दगडाचे नमुने घेण्यात येत असल्याचे संबंधित व्हिडिओमध्ये दिसत आहे. मेट्रो प्रशासनाकडून प्रथमच पेरिस्कोपच्या माध्यमातून असा कामाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. मेट्रोचे काम पारदर्शक करण्याचा प्रयत्न असल्याचे यातून दिसते. यामुळे पुणे मेट्रोच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाचे आता प्रत्यक्षात सुरू होताना दिसू लागले आहे. 

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी काम सुरू असल्याचे फलक लावून या रस्त्यावरून वाहनचालकांनी वाहने सावकाश चालविण्याचे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पिंपरी ते स्वारगेट दरम्यान प्रस्तावित असणाऱ्या मेट्रो प्रकल्पाचे काम झटपट पूर्ण होणार आहे त्याचे कारण म्हणजे यामधील सुमारे 11.57 किलोमीटरचा मार्ग एलिव्हेटेड राहाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी मोठ्या भूसंपादनाची आवश्‍यकता नसल्याचे समोर आले आहे. 

शहरातील मेट्रो प्रकल्प हा पर्यावरणपूरक असेल, अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात येणार असल्याचे नुकतेच स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, या प्रकल्पासाठी 'महामेट्रो कंपनी' स्थापन करण्यात आली असून, पिंपरी- शिवाजीनगर- स्वारगेट मार्गाचे काम पहिल्यांदा सुरू होणार आहे. 

याबाबत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित म्हणाले, "पिंपरी चिंचवड ते स्वारगेट दरम्यानच्या मेट्रोमार्गाचे अंतर 16.139 किलोमीटर असून, त्यातील साधारण 5 किलोमीटरचा मार्ग (शिवाजीनगर ते स्वारगेट) हा भुयारी आहे. उर्वरित मार्ग जमिनीवरून (एलिव्हेटेड) असेल. या मार्गात एकूण 15 स्थानके आहेत. वनाज ते रामवाडी हे अंतर 14.665 किलोमीटरचे असून, त्यावर 16 स्थानके आहेत. हा संपूर्ण मार्ग जमिनीवरून आहे.'' 

भुयारी मार्गाची खोली 12 मीटर व जमिनीवरील मार्गाची उंची 12 मीटर असेल. जमिनीवरील मार्गासाठी कॉंक्रीटच्या गर्डर्सची उभारणी केली जाणार आहे. दोन्ही मार्गांवरची स्थानके तीन मजली असतील. पहिला मजला प्रवाशांची येजा करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. दुसरा मजला तिकीट काढण्यासाठी व प्रवाशांना थांबण्यासाठी व तिसरा मजला थेट रेल्वेत जाण्यासाठी असेल. स्थानकांच्या उंचीनुसार रेल्वेची उंची बदलेल, असेही दीक्षित यांनी सांगितले. कंपनीचे संचालक रामनाथ सुब्रमण्यम या वेळी उपस्थित होते. 

तासी वेग 80 किलोमीटर 
मेट्रोचा वेग प्रतितास 80 किलोमीटर असेल. सुरवातीचा टप्पा 2018 मध्ये पूर्ण झाल्यानंतर दररोज साधारण 3 लाख 82 हजार 577 प्रवासी गृहीत धरण्यात आले आहेत. हे काम पुढे सुरू राहणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच ते सहा लाखांपेक्षा अधिक प्रवासी मेट्रोचा वापर करतील. या प्रकल्पासाठी येत्या दोन महिन्यांत निविदा प्रक्रिया सुरू होईल, असेही ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले. 

प्रकल्पाची वैशिष्ट्ये 

 • संपूर्ण मेट्रो असेल वातानुकूलित 
 • ऑटोमॅटिक तिकीट आकारणी यंत्रणा 
 • स्थानकांच्या छतावर सोलर पॅनेल 
 • सौरऊर्जा वापराला प्राधान्य 
 • स्थानकांवर 24 तास सीसीटीव्ही यंत्रणा 
 • वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर 
 • कचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञान 
 • वाहनतळ सुविधाही उपलब्ध करणार 
 • महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व अपंगासाठी विशेष सुविधा 
   
Web Title: rock and soil sample collection for pune metro