राजकीय पक्षांची भूमिका गुलदस्तात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

पुणे - विधान परिषद निवडणुकीसाठी शनिवारी (ता. 19) मतदान होणार असतानाही या निवडणुकीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची मते कोणत्या उमेदवाराला द्यायची, याबाबत राजकीय पक्षांची भूमिका गुलदस्तात आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असल्याने प्राधान्यक्रमाबद्दल उत्सुकता आहे. 

पुणे - विधान परिषद निवडणुकीसाठी शनिवारी (ता. 19) मतदान होणार असतानाही या निवडणुकीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची मते कोणत्या उमेदवाराला द्यायची, याबाबत राजकीय पक्षांची भूमिका गुलदस्तात आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असल्याने प्राधान्यक्रमाबद्दल उत्सुकता आहे. 

विधान परिषदेच्या पुणे मतदारसंघातील एका जागेसाठी शनिवारी मतदान होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अनिल भोसले, कॉंग्रेसचे संजय जगताप, भाजपचे अशोक येनपुरे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर विलास लांडे रिंगणात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या नेत्यांमधील चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतरही दोन्ही कॉंग्रेसची शेवटपर्यंत आघाडी होऊ शकलेली नाही. या निवडणुकीतून शिवसेनेने माघार घेतली तर, मनसेने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या प्राधान्यक्रमावरून राजकारण होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

निवडणुकीत झालेल्या एकूण मतांपैकी निम्म्याहून अधिक मते पहिल्या फेरीत मिळणे अपेक्षित असतात. प्राधान्यक्रम ठरवून दिला जातो. पहिल्या फेरीत अपेक्षित मते न मिळाल्यास दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमाकांचा प्राधान्यक्रम निर्णायक ठरू शकतो. त्यामुळे प्राधान्यक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

मात्र, या संदर्भात राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. या निवडणुकीतील उमेदवारांना प्राधान्यक्रमानुसार पसंती देण्याची सूचना पक्षाने केलेली नाही. त्यामुळे निर्णय झालेला नाही; परंतु मतदानाच्या एक-दोन दिवस आधी याबाबत आदेश काढला जाण्याची शक्‍यता आहे. त्यानुसार त्या-त्या पक्षाच्या मतदारांना आदेश दिला जाईल, असे सांगण्यात आले. 

दरम्यान, या निवडणुकीत एकच मत देण्याचा आदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मतदारांना देण्यात आल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. 

पक्षनिहाय मते 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ः 278 

कॉंग्रेस ः 124 

भाजप ः 62 

शिवसेना ः 75 

मनसे ः 36 

आरपीआय ः 4 

Web Title: The role of political parties