esakal | ‘हॅपिनेस डब्बा’ देत आहे गरजूंना आधार !

बोलून बातमी शोधा

happiness tiffin

‘हॅपिनेस डब्बा’ देत आहे गरजूंना आधार !

sakal_logo
By
मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे : ‘‘कोरोनाच्या रुग्णांना जेवण पुरविताना त्यांच्या बोलण्यातून लक्षात आले की, रुग्णालयात थांबलेल्या त्यांच्या नातेवाईकांची जेवणाची आबाळ होत आहे. म्हणून ससूनमध्ये गेले. तेथे तर, अनेक नातेवाईकांचे हाल होत असल्याचे दिसले. रुग्णवाहिकांच्या चालकांचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. त्यामुळे त्या सगळ्यांना जेवणाचे डब्बे पुरविण्यास सुरवात केली. मागणी वाढत गेली तसे डबेही वाढत गेले,’’ सांगत होत्या सध्या रोज ५०० च्या आसपास जेवणाचे डबे पुरविणाऱ्या रॉनिता घोष.

हेही वाचा: 'सिर्फ तीस मिनिट...',खाकी वर्दीतल्या देवदूताने वाचवले कोरोनाबाधितांचे प्राण

जिकोनी फूडसच्या संचालक असलेल्या रॉनिता यांचा पुणे आणि मुंबईत खाद्यपदार्थ पुरविण्याचा व्यवसाय आहे. लॉकडॉऊनमुळे तो व्यवसाय सध्या थंडावला आहे. बाणेरमध्ये त्यांच्या घराजवळच्या गरजू कोरोना रुग्णांना त्यांनी जेवण पुरविण्यास गेल्या आठवड्यात सुरवात केली. सुरवातीला १५-२० डबे त्या देत होत्या. त्यांच्याकडून नातेवाईकांचे हाल होत असल्याचे समजले. त्यामुळे रॉनिता ससून रुग्णालयात पोचल्या.

हेही वाचा: मांडूळ जातीच्या दुर्मिळ सापाला जीवदान

ससूनच्या प्रतिक्षालयात त्यांना नातेवाइकांची गर्दी दिसली. चहा - पावावर दिवस काढणारे अनेकजण त्यांना दिसले. रॉनिता यांना ते पाहवले नाही. दुसऱ्या दिवसापासून त्यांनी घरी डबे तयार करण्यास सुरवात केली. पहिल्या दिवशी म्हणजे गेल्या सोमवारी त्या १०० डबे घेऊन त्या ससूनमध्ये पोचल्या. रुग्णांच्या नातेवाईकांबरोबरच रुग्णवाहिकांचे ड्रायव्हर्स, सुरक्षारक्षक यांनाही डबे देण्यास त्यांनी सुरवात केली. गर्दी होत असल्यामुळे त्यांचे ग्रुप केले. त्यांना डबे देऊ लागल्या.

ससूनच्या मागे पदपथावर राहणारी अनेक कुटुंबेही त्यांना दिसली. त्यांनाही डबे देण्यास सुरवात केली. बाणेर ते ससून दरम्यानच्या रस्त्यावर अनेकांना मदत करण्यास सुरवात केली. रॉनिता यांनी ही परिस्थिती ट्विटरवर टाकली. त्यातून बाणेरमधील अनेक नागरिक स्वेच्छेने त्यांच्या मदतीला पुढे आले. त्यातून बाणेर ते देहूरोडपर्यंतच्या मार्गावरही त्यांचे डबे जाऊ लागले.

पर्यावरण पूरक डब्यांतून रॉनिता डाळ-तांदळाची वेगवेगळ्या प्रकारची खिचडी गरजूंना पुरवितात. काही रुग्णांचाही त्यात समावेश आहे. त्यासाठी आता पहाटे साडेपाच वाजताच त्यांच्या बाणेरच्या घरी तयारी सुरू होते. शक्य होईल तेवढा खर्च त्या स्वतः करतात. आता त्यांचा मित्र परिवारही पुढे सरसावला. रविवारपर्यंत त्यांच्या डब्यांची संख्या ५०० पर्यंत पोचली. या उपक्रमात नितीन वेल्डे, अवधूत भाटे, रोहित कुलकर्णी, निक ठक्कर, शंतनू जगताप, गणेश पारेकर, श्रुती कुलकर्णी, संकर्षण कुलकर्णी यांच्यासह अनेकजण त्यांना मदत करीत आहेत.

हेही वाचा: रेमडेसिव्हिरच्या रिकाम्या बाटल्या ‘बोलणार’

रॉनिता म्हणाल्या, ‘‘संकटच्या वेळी आपण समाजाला मदत केली पाहिजे, या भावनेतून हा उपक्रम सुरू केला. आणखी दोन महिने तो सुरू ठेवण्याची इच्छा आहे. डब्यांबरोबरच काही लोकांना मास्कची गरज आहे, असे दिसल्यावर तेही पुरविण्यास सुरवात केली आहे. मास्क नाकावर असला पाहिजे, असे त्यांना बजावले जाते. आता ससून प्रशासनही या उपक्रमाला सहकार्य करू लागले आहे.’’

रॉनिता या ट्विटरवर सक्रिय असून @rons1212 या त्यांच्या अकाऊंट हॅंडवलवरून रोजचे अपडेट्स शेअर करतात. #HappinessDabba हा त्यांनी ट्रेंड सुरू केला असून तो देखील आता लोकप्रिय होत आहे.