esakal | मांडूळ जातीच्या दुर्मिळ सापाला जीवदान

बोलून बातमी शोधा

snake
मांडूळ जातीच्या दुर्मिळ सापाला जीवदान
sakal_logo
By
रवींद्र पाटे

नारायणगाव : तोंडाच्या भागा जवळ प्लास्टिकची रिंग अडकून संकटग्रस्त असलेल्या मांडूळ जातीच्या दुर्मिळ सापाला सर्पमैत्रिण, रेस्क्यू टीम सदस्य व वन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. अंधश्रद्धेमुळे मांडूळ जातीच्या सापाची तस्करी होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळे मांडूळ सापाची प्रजाती धोक्यात आली आहे. वास्तविक मांडूळ उपद्रव नसणारा बिनविषारी साप आहे. त्याच्या मातीमिश्रीत विष्टेमुळे जमीन सुपीक व भुसभुशीत होत असल्याने शेती पिकाच्या उत्पादनात वाढ होत असल्याने मांडूळाला शेतकऱ्याचा मित्र संबोधले जाते.

हेही वाचा: जुन्नर : आचाऱ्याचा खून करणारा अल्पवयीन मुलगा गुन्हे शाखेच्या ताब्यात

शनिवारी रात्री येथील गणपिर बाबा डोंगरा जवळ असलेल्या जुन्नर बाजार समितीच्या धना, मेथी बाजारात सुमारे साडेतीन फूट लांबीचा मांडूळ साप आढळून आला. या बाबतची माहिती शेतकऱ्यांनी सर्पमैत्रिण नागेश्वरी केदार व बिबट रेस्क्यू टीमचे सदस्य किरण वाजगे यांना सांगितली. पकडल्या नंतर या मांडूळ सापाच्या तोंडाच्या भागा जवळ प्लास्टिकची रिंग अडकली असल्याचे केदार व वाजगे यांना दिसून आले. प्लास्टिकची रिंग अतिशय कडक असल्याने व मांडूळाच्या शरीरा भोवती घट्ट बसल्याने ती काढणे अवघड होते. या मुळे केदार यांनी रिंग काढण्यासाठी मांडूळ माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रातील डॉ. निखिल बनगर व वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांच्या ताब्यात दिले. डॉ. बनगर यांनी मांडूळाच्या शरीरा भोवती घट्ट बसलेली प्लास्टिकची रिंग शिताफीने कापून काढली. रविवारी सकाळी नैसर्गिक अधिवासामध्ये त्याला सोडून दिले.सर्पमैत्रिण केदार, रेस्क्यू टीम सदस्य वाजगे व वन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बनगर यांच्या सतर्कतेमुळे मांडूळाला जीवदान मिळाले.

हेही वाचा: Corona सक्रीय रुग्णांमध्ये बंगळूर अव्वल, पुणे दुसऱ्या स्थानावर