हरण्यासाठी उभे राहायचे का 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

पुणे - पक्षाला कायमस्वरूपी चिन्ह मिळण्यासाठी नेतृत्व किंवा पदाधिकारी प्रयत्न करत नाहीत. निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर इतर चिन्ह घेण्याची वेळ येणे, हा पक्षनेतृत्व व पदाधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा आहे. प्रत्येक निवडणुकीत "आरपीआय'च्या उमेदवारांनी फक्त हरण्यासाठीच उभे राहायचे का, असा संतप्त सवाल रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. 

पुणे - पक्षाला कायमस्वरूपी चिन्ह मिळण्यासाठी नेतृत्व किंवा पदाधिकारी प्रयत्न करत नाहीत. निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर इतर चिन्ह घेण्याची वेळ येणे, हा पक्षनेतृत्व व पदाधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा आहे. प्रत्येक निवडणुकीत "आरपीआय'च्या उमेदवारांनी फक्त हरण्यासाठीच उभे राहायचे का, असा संतप्त सवाल रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. 

पक्षचिन्ह नसणे आणि शहर कार्यकारिणी बरखास्त करण्याच्या राजा सरोदे यांनी घेतलेल्या निर्णयानंतर कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. अनेक कार्यकर्त्यांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्ही 30 वर्षे पक्षाचे काम करत आहोत. 1992 ते 2017 या कालावधीत असंख्य निवडणुका आम्ही पाहिल्या; परंतु प्रत्येकवेळी नवीन चिन्हावर निवडणूक लढवावी लागते. चिन्हाच्या अभावामुळे विधानसभा, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत सतत पराभवाला सामोरे जावे लागत आहे. किती दिवस हार पत्करायची? वेगळ्या प्रयोगांद्वारे एकदा तरी निवडून येण्याची क्षमता दाखवून देऊ, अशी भावनिक प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. 

सरोदे यांचा निर्णय अमान्य - शेवाळे 
पुणे - ""पुणे शहर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करणे आणि उमेदवारांना निलंबित करण्याचा पक्षाचे सरचिटणीस राजा सरोदे यांचा निर्णय आम्हाला मान्य नाही. पक्षाध्यक्ष रामदास आठवलेंच्या नावाने सरोदे चुकीचा निर्णय लादत आहेत. आठवले स्वतः भूमिका स्पष्ट करत नाहीत, तोपर्यंत कार्यकारिणी बरखास्त आणि उमेदवारांचे निलंबन होऊ देणार नाही,'' अशी भूमिका रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) केंद्रीय निरीक्षक व कोशाध्यक्ष एम. डी. शेवाळे यांनी बुधवारी घेतली. 

आठवले यांच्या आदेशानंतरही पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूरमधील पक्षाच्या कार्यकारिणीने महापालिका निवडणुकीसाठी कमळ चिन्ह घेतले. याची दखल घेऊन पक्षाचे राज्य सरचिटणीस सरोदे यांनी सोलापूर येथे पुण्याची कार्यकारिणी बरखास्त करण्याची आणि उमेदवारांच्या निलंबनाची घोषणा केली. त्यामुळे आरपीआयच्या शहर कार्यकारिणीत बुधवारी सायंकाळी गोंधळ उडाला. त्यानंतर शेवाळे यांनी बैठक घेतली. या बैठकीस नवनाथ कांबळे, परशुराम वाडेकर, महेश शिंदे, बाळासाहेब जानराव, हनुमंत साठे, असित गांगुर्डे, महिपाल वाघमारे, अशोक कांबळे, रफिक दफेदार, वसीम पहिलवान आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

शेवाळे म्हणाले, ""मी पुणे शहराचा निरीक्षक असून, मला याबाबत माहिती किंवा पूर्वसूचना न देता सरोदे यांनी हा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर दोन दिवसांत आमच्याशी चर्चा करणार होते. त्यानंतर पुण्याचा अहवाल आठवले यांना सादर केला जाणार होता. तशी थुलकर आणि आठवले यांच्यात चर्चाही झाली होती. पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नागपूरसह अनेक ठिकाणी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कमळ चिन्ह घेतले आहे. असे असताना फक्त पुण्याबाबतच दुजाभाव का? शहर कार्यकारिणीस कोणत्याही प्रकारची नोटीस, पूर्वसूचना नाही. त्यामुळे यापुढेही पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून महेंद्र कांबळे आणि त्यांची कार्यकारिणीच कामकाज पाहील.'' 

Web Title: rpi pune municipal corporation election