गाईच्या दूध खरेदीदरात 3 रुपये वाढ 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जुलै 2018

पुणे : राज्यातील सहकारी व खासगी दूध उत्पादक संघांनी शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला प्रतिलिटर तीन रुपयांची दरवाढ देण्याचा निर्णय शनिवारी पुण्यात झालेल्या बैठकीत घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 21 जुलैपासून केली जाणार आहे. परंतु, विक्रीच्या दरात कोणतीही वाढ केली जाणार नसल्याचे सोनाई दूध परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, स्वराज दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर आणि पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे माजी उपाध्यक्ष गोपाळ म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

केंद्र आणि राज्य सरकारने खासगी व सहकारी दूध उत्पादक संघाच्या काही महत्त्वपूर्ण मागण्या मंजूर केल्या आहेत. या मागण्यांची पूर्तता झाल्यानंतर आणखी दोन टप्प्यात प्रतिलिटर प्रत्येकी एक रुपयाप्रमाणे ही दरवाढ प्रतिलिटर पाच रुपयांपर्यंत केली जाणार आहे. दुसरा टप्पा 1 ऑगस्टपासून सुरू केला जाणार आहे. शेतकऱ्यांना या तारखेपासून चार रुपयांची वाढ मिळणार असल्याचे माने यांनी या वेळी स्पष्ट केले. 

माने म्हणाले, "दुधाचा दर हा दूध पावडरच्या दरावर अवलंबून असतो. मध्यंतरीच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर प्रतिकिलो 230 रुपयांवर गेले होते. त्यामुळे दूध संघ शेतकऱ्यांना प्रतिलिटर सुमारे 30 रुपये किंवा त्याहून अधिक दर देऊ शकत होता. आता हेच दर 130 रुपयांवर आले आहेत. त्यामुळे दुधाचा दर नाइलाजाने आठ ते नऊ रुपयांपर्यंत खाली आणावा लागला. दर पूर्ववत करण्यासाठी राज्यातील खासगी व सहकारी दूध संघांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या. त्यात प्रामुख्याने दुधाच्या उपपदार्थांच्या विक्रीवर लावण्यात येणारा 12 टक्के जीएसटी कमी करून तो पाच टक्के करावा, दूध पावडरच्या निर्यातीला प्रतिकिलो 50 रुपयांचे अनुदान द्यावे आणि शालेय पोषण आहारात दूध पावडरचा समावेश करावा, आदी प्रमुख मागण्यांचा समावेश होता. या तिन्ही मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. जीएसटी कमी झाल्यानंतर एक रुपया आणि दूध पावडर अनुदान मंजूर झाल्यानंतर आणखी एक रुपयाची वाढ दिली जाणार आहे.'' 

Web Title: Rs. 3 per day increase in the purchase of cow milk