आरटीओचे पहिले सेवा केंद्र शिक्रापुरात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

शिक्रापूर - प्रादेशिक परिवहन विभाग व राज्य सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने राज्यातील पहिले आरटीओ सेवा केंद्र शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सुरू करण्यात आले आहे. शिरूर तालुक्‍यातील प्रत्येक पंचायत समिती गणात एक अशी चौदा आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात एक अशी चौदा आरटीओ सेवा केंद्र येत्या वर्षभरात सुरू करण्याची घोषणा प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी केली.

या वेळी आमदार बाबूराव पाचर्णे उपस्थित होते. प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) सेवा या पुणे व निगडी कार्यालयातच मिळण्याची सुविधा होती. मात्र या सर्व सेवा ऑनलाइन करून त्या एकाच केंद्राद्वारे कार्यान्वित करण्याचा प्रकल्प सहा महिन्यांपूर्वी केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत राज्य सरकार पातळीवर हाती घेण्यात आला होता. ही सेंटर्स नेमण्यासाठी सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने सीएससीचा (कॉमन सर्व्हीस सेंटर) पर्याय प्रादेशिक परिवहन विभागाला दिला. त्यानुसार राज्यातील पहिल्या आरटीओ सेवा केंद्राची सुरवात शिक्रापुरात झाली असून या केंद्राचे औपचारिक उद्‌घाटन आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या हस्ते व प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. दरम्यान आरटीओच्या सर्व कर, प्रमाणपत्र, मालकी, वाहन परवाना, फॅन्सी नंबर, वाहन विमा आदींसह सर्व सेवा या केंद्राद्वारे सरकारने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे दिल्या जाणार असल्याची माहिती आजरी यांनी दिली. शिक्रापूरचे केंद्र संचालक सुधीर मुळे यांचा सत्कार या वेळी वरील मान्यवरांनी केला. कार्यक्रमाला सरपंच जयश्री भुजबळ, सीएससीचे राज्य विभागप्रमुख वैभव देशपांडे, रुपम कुमार, विक्रम दलाल, नीलेश धांडे, माजी सरपंच रामभाऊ सासवडे, सुरेश थोरात आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चालक परवाना चाचणी 
तालुका पातळीवर चालक परवाना देण्याची शिबिरे आरटीओकडून सुरू आहेत. मात्र ही शिबिरे आता जिल्ह्यात सुरू होणाऱ्या आरटीओ सेवा केंद्रांद्वारे सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितली आहे. ती मिळताच चालक परवाना चाचणी या केंद्रांमधून होतील अशी माहिती बाबासाहेब आजरी यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTO Service center in shikrapur