सुटीच्या दिवशीही "आरटीओ'चे काम सुरू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कर्मचारी संख्या वाढविण्याबरोबरच रविवारीही कामकाज सुरू ठेवले आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना होणारा त्रास कमी झाल्याने पंचायतीच्या वतीने "आरटीओ'च्या या कामकाजाचे स्वागत केले आहे. 

पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कर्मचारी संख्या वाढविण्याबरोबरच रविवारीही कामकाज सुरू ठेवले आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना होणारा त्रास कमी झाल्याने पंचायतीच्या वतीने "आरटीओ'च्या या कामकाजाचे स्वागत केले आहे. 

कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, संगणक प्रणालीतील त्रुटी यामुळे योग्यता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रिक्षाचालकांना दिवसेंदिवस रांगेत उभे राहावे लागत होते. याबाबत रिक्षाचालकांनी पंचायतीकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांना भेटून अडचणी सोडविण्याबाबत निवेदन दिले होते. त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. दोन दिवसांपूर्वी आळंदी येथील परिवहन कार्यालयास रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी भेट दिली. त्या वेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी कामकाजात सुधारणा करण्याचे आश्‍वासन दिले होते. 

त्यानुसार आज पंचायत प्रतिनिधींनी आळंदी परिवहन तपासणी कार्यालयास भेट दिली. योग्यता प्रमाणपत्र व इतर परिवहनविषयक कामे वेळेत मार्गी लागत असल्याचे दिसून आले. वाहनधारकांची संख्या एकदम वाढल्याने रविवारीही योग्यता प्रमाणपत्रासाठी तपासणीचे काम चालू ठेवण्यात आल्याचे दिसून आले. तपासणी अधिकाऱ्यांच्या संख्येत तिपटीने वाढ केल्याने आणि कामकाज सकाळी साडेआठपासून सुरू केल्याने रिक्षांची रांग कमी झाली. संगणक प्रणालीतील त्रुटीही आटोक्‍यात आणून योग्यता प्रमाणपत्रही तत्काळ देण्यात आले. त्यावर पंचायतीने समाधान व्यक्त केले. तसेच यात सातत्य राहावे, ही अपेक्षा नितीन पवार यांनी व्यक्त केली. 

Web Title: RTO's work on holiday