रुबी हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीवर त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी केली मात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

अग्निशमन दलाचे जवान पोहोचले खरे; परंतू हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी अग्निरोधक उपकरणे व पाणी वापरुन आगीवर वेळीच नियंत्रण मिळवले व मोठा अनर्थ टाळला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. 

पुणे : रुबी हॉस्पिटलमध्ये चौथ्या मजल्यावर रविवारी (ता.14) दुपारी चार वाजता आगीचा किरकोळ प्रकार घडला. सदर ठिकाणी किरकोळ स्वरुपात कागदपत्रे व काही वस्तूंने पेट घेतल्याने धूर येत असल्याचे हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी स्वत:तत्परतेने आग विझवण्यासाठी धाव घेत अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली.

अग्निशमन दलाचे जवान पोहोचले खरे; परंतू हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी अग्निरोधक उपकरणे व पाणी वापरुन आगीवर वेळीच नियंत्रण मिळवले व मोठा अनर्थ टाळला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. वेळेवर आग विझली नसती तर, त्यामुळे मोठा अनर्थ झाला असता.

संबंधित विभागातील दिवंगत दयाराम राजगुरू अग्निशमन केंद्र वेळोवेळी देत असलेले अग्निसुरक्षेविषयक प्रशिक्षणाचा फायदा झाला. तसेच यामुळे हे कर्मचारी धाडसाने आग विझवू शकले असे देखील दलाचे जवान म्हणाले. अग्निशमन दल सातत्याने शहरात अग्निसुरक्षा विषयक माहिती व प्रात्यक्षिकांचे धडे देत असते.
 

Web Title: Rubby Hospitals Fire Control by their Employees