ग्रामीण भागात दळणवळण सुसाट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

पीएमआरडीएच्या ग्रामीण हद्दीतील वाहतुकीच्या आराखड्यासाठी नेमलेल्या ‘एल अँड टी’ कंपनीने प्रारूप अहवाल सादर केला. त्यांच्याकडून अंतिम अहवाल सादर केला जाईल.
- विक्रम कुमार, आयुक्त, पीएमआरडीए

पुणे - सुमारे सात हजार ३०० चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या ग्रामीण हद्दीचा प्रारूप ‘सर्वंकष वाहतूक आणि दळणवळण आराखडा’ (सीटीटीएस) ‘एल अँड टी कंपनी’कडून पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) सादर करण्यात आला आहे. लघू, मध्यम आणि दीर्घ स्वरूपाचे प्रकल्प या अहवालात प्रस्तावित करण्यात आले असून त्यामध्ये रेल्वे, जल वाहतुकीबरोबरच मेट्रो, हायपरलूप यांच्यासह अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत.

शहर व ग्रामीण भागातील वाहतुकीचा आराखडा तयार करण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने निविदा मागवून एल अँड टी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या कंपनीकडून यापूर्वीच शहर आणि शहरालगतच्या सुमारे वीस किलोमीटर परिसरातील हद्दीचा ‘सर्वंकष वाहतूक आराखडा’ (सीएमपी) तयार करून पीएमआरडीएला सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये पुणे-पिंपरी-चिंचवड आणि तिन्ही कॅंटोन्मेंटसह सुमारे दोन हजार चौरस किलोमीटर लांबीच्या परिसरातील वाहतुकीचा या आराखड्यात विचार करण्यात आला आहे. या भागातील वाहतूक सुरळीत आणि गतिमान करण्यासाठी मेट्रोसह सुमारे ६६ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित केले आहेत.

तर, दुसऱ्या टप्प्यातील प्राधिकरणाच्या ग्रामीण हद्दीसाठी ‘सर्वंकष वाहतूक आणि दळणवळण आराखडा’ तयार करण्याचे काम या कंपनीकडून हाती घेण्यात आले होते. कंपनीकडून हे काम नुकतेच पूर्ण झाले. त्यांचा प्रारूप अहवाल पीएमआरडीएकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालात तीन टप्प्यांतील प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. या अहवालावर पीएमआरडीएकडून अभ्यास करून, आवश्‍यक ते बदल करून, तसेच काही त्रुटी असतील, तर दूर करण्याच्या सूचना कंपनीला केल्या जातील. त्यांनतर त्या सुधारणा करून अंतिम अहवाल कंपनीकडून सादर केला जाईल, असे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rural Area Transport L&T PMRDA Report