ग्रामीण भागातील कोरोनाग्रस्तांसाठी दिलासादायक बातमी; एकाही रुग्णाचा व्हेंटिलेटरवरअभावी मृत्यू होणार नाही

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 August 2020

राज्यातील पहिला कोरोना रुग्ण ९ मार्चला पुणे शहरात सापडला होता. तेव्हापासून कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे, पण या संसर्गाच्या सुरवातीचे दोन महिन्यात ग्रामीण भागात फारसा संसर्ग नव्हता.

पुणे : कडाचीवाडी हे खेड तालुक्यातील छोटंसं खेडं. आसपास सुविधायुक्त रुग्णालयाचा अभाव. मात्र जवळच चाकण हे त्यातल्या त्यात जरा बऱ्या सुविधा असलेलं ग्रामीण शहर. पण या शहरातही अत्यवस्थ कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कृत्रीम श्वासोच्छवास यंत्राची (व्हेंटिलेटर) सुविधा उपलब्ध नाही. यामुळे महिनाभरात केवळ व्हेंटिलेटर अभावी खेड तालुक्यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. 

यामध्ये कडाचीवाडी येथील एका तरुण आडत्याला तर, दुसऱ्या एका घटनेत याच तालुक्यातील ठाकूर पिंपरी येथील ५५ वर्षीय शेतकऱ्याचा समावेश आहे. अशाच पद्धतीच्या काही घटना अगदी पुणे शहरालगत असलेल्या गावांमध्येही घडल्या. अगदी पुणे शहराच्या उशालाच असलेल्या गुजर निंबाळकरवाडी गावातील एका वृद्धेचा तर अक्षरशः तडफडून मृत्यू झाला. ही ग्रामीण भागातील काही प्राथमिक उदाहरणे आहेत. जिल्ह्यात सर्वत्र अशीच स्थिती पहावयास मिळत होती. परंतू आता त्यावर काही अंशी मार्ग निघाला आहे.  

Big Breaking : पुण्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा उच्चांक; एकाच दिवसात 'इतक्या' रुग्णांचा मृत्यू   

जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना आणखी ५० व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे आता ग्रामीण भागातील एकाही कोरोना रुग्णाचा व्हेंटिलेटरवरअभावी मृत्यू होणार नसल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी सांगितले.

पुणे जिल्हा परिषदेने यासाठी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे यासाठी सातत्याने मागणी केली होती. त्यानुसार पवार यांनी आणखी किमान ५० व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार पवार यांच्या पुढाकाराने टाटा कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी ५० व्हेंटिलेटर तत्काळ उपलब्ध करून दिले आहेत. हे व्हेंटिलेटर स्वातंत्र्यदिनी संबंधित रुग्णांलयांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

पानशेतही ओव्हर फ्लो; मुठा नदीत पाण्याचा विसर्ग वाढला!​

राज्यातील पहिला कोरोना रुग्ण ९ मार्चला पुणे शहरात सापडला होता. तेव्हापासून कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे, पण या संसर्गाच्या सुरवातीचे दोन महिन्यात ग्रामीण भागात फारसा संसर्ग नव्हता. शिवाय रुग्णही मोजकेच होते. परंतू जूनपासून हे लोण पसरत गेले. त्यानंतर जून व जुलै या दोन महिन्यात अनेकांचा केवळ व्हेंटिलेटरअभावी मृत्यू झाला, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. 

त्यामुळेच पालकमंत्री पवार यांच्याकडे यासाठी जिल्हा परिषदेने सातत्याने  पाठपुरावा केल्याचेही शिवतरे यांनी स्पष्ट केले. 

 ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषद सातत्याने प्रयत्न करत आहे. त्या प्रयत्नांना यश येत आहे. त्यानुसार व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करण्यातही यश आले आहे.

- प्रमोद काकडे, बांधकाम व आरोग्य सभापती, जिल्हा परिषद, पुणे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In rural areas of Pune district 50 ventilators available for corona patients