नवरात्रोत्सवानिमित्त पूजा साहित्य खरेदीसाठी गर्दी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

पुणे - आश्‍विन शुद्ध प्रतिपदा अर्थात शनिवार (ता. 1) पासून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. घटस्थापनेसाठी पहाटे पाच या ब्राह्ममुहुर्तापासून दुपारी दीड वाजेपर्यंत सुमुहूर्त आहे. यानिमित्ताने देवादिकांसाठी रेशमी वस्त्रे, घट (सुगडे), घटाला वावरी (काळी माती), दुरडी, पत्रावळ्या, लाकडी मंडपी ते अगदी ओटी भरण्याचे साहित्य, विड्याची पाने यांसह पूजा साहित्य खरेदीचा मुहूर्त नागरिक साधत आहेत. तसेच खासगी, सार्वजनिक मंदिरे व मंडळांची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. 

नवरात्रोत्सवानिमित्त प्रतिपदा ते नवमीदरम्यान देवीच्या मंदिरांत घटस्थापना, रुद्राभिषेक, महिला मंडळांचे भजन, कीर्तन, प्रवचन, भावगीत व भक्तिगीतांचे कार्यक्रम, ललिता पूजन, कुमारिका पूजन, नवचंडी याग आदी कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. विजया दशमीला सीमोलंघनानिमित्त देवीचा छबिना (मिरवणूक) निघेल. तर कोजागरी पौर्णिमेला देवीला अभिषेक, वस्त्रालंकार पूजा आणि जागरण गोंधळाने उत्सवाची सांगता होईल. उत्सवकाळात देवीला नारळाचे तोरण वाहण्याची परंपरा आहे. त्यामुळे बाजारपेठेत नारळासह केळीची पाने, फळे यासह करंडा, फनी, हिरव्या बांगड्या, सुपारी, हळदी-कुंकू, खारीक-खोबरे आदी देवीच्या ओटीचे साहित्य, गुलाल, बुक्का, दोऱ्याचे बंडल, कापसाचे वस्त्र आणि वाती तसेच, सात प्रकारच्या धान्याच्या पुड्या (गहू (खपले), हरभरा, बाजरी, मूग, डाळ, मटकी व करडई) यांसारख्या पूजा साहित्यांसह रांगोळी, सजावट साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे.
विक्रेत्या शीतल काळभोर म्हणाल्या, ""पूजेकरिता अत्तर, गुलाबपाणी, नाडा (रंगीत सूत), धूप, उदबत्त्यांसह विविध प्रकारचे साहित्य आले आहे. घटाकरिता मातीची सुगडीही आली आहे. दहा रुपयांपासून अनेक प्रकारच्या वस्तू बाजारपेठेत उपलब्ध आहेत.''

यंदा 11 दिवस नवरात्रोत्सव
नवरात्रोत्सवानिमित्त शनिवारी पहाटे पाच या ब्राह्ममुहुर्तापासून दुपारी दीड वाजेपर्यंत घटस्थापनेसाठी सुमुहूर्त आहे. यादिवशी सकाळी नऊ ते साडेदहा वाजेपर्यंत राहुकाल आहे. तरीही त्या वेळेत घटस्थापना, देवीचे पूजन करता येईल. 11 ऑक्‍टोबरला विजया दशमी (दसरा) आहे. यंदा 11 दिवस नवरात्रोत्सव आहे. यापूर्वी 1998 मध्येही 11 दिवसांचा नवरात्रोत्सव होता, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी कळविले आहे.

Web Title: Rush to buy the ingredients for worship navaratrotsava