"फेथ'तर्फे आज पुण्यात "रूथ' नाट्यप्रयोग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

पिंपरी : नाताळ महोत्सवानिमित्त "रूथ' या देवाच्या सेविकेची जीवनकथा रंगमंचावर नाटकाच्या माध्यमातून उलगडणार आहे. फेथ ग्रुपचे हौशी युवा कलाकार "बायबल'वर आधारित "रूथ' हा संगीतमय इंग्रजी नाट्यप्रयोग येत्या 8 डिसेंबरला पुण्यात सादर करणार आहेत. ख्रिस्ती बांधवांना या नाटकाचा आनंद विनाशुल्क घेता येणार आहे.

पिंपरी : नाताळ महोत्सवानिमित्त "रूथ' या देवाच्या सेविकेची जीवनकथा रंगमंचावर नाटकाच्या माध्यमातून उलगडणार आहे. फेथ ग्रुपचे हौशी युवा कलाकार "बायबल'वर आधारित "रूथ' हा संगीतमय इंग्रजी नाट्यप्रयोग येत्या 8 डिसेंबरला पुण्यात सादर करणार आहेत. ख्रिस्ती बांधवांना या नाटकाचा आनंद विनाशुल्क घेता येणार आहे.

फेथ ग्रुप ही ख्रिस्ती बांधवांची सामाजिक संस्था आहे. या ग्रुपचे युवा कलावंत ब्रदर नोएल व्हॅनहॉल्ट्रन यांच्या मार्गदर्शनाखाली नाताळनिमित्त दरवर्षी बायबलमधील एका विषयावर नाटक सादर करतात. पुण्यातील फातिमानगर, वानवडीमधील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात सायंकाळी सहा वाजता हा प्रयोग होणार आहे. यंदा "रूथ' नावाच्या एका सद्‌गुणी स्त्रीच्या व्यक्तीरेखेवर आधारित नाटिका आहे. पवित्र शास्त्रात नमूद केल्याप्रमाणे "रूथ' ही विधवा झाल्यावरही "नामी' नावाच्या आपल्या सासूची ती रात्रंदिवस सेवा करते. तिची काळजी घेते, तिचा सांभाळ करते. असा "रूथ'चा जीवनप्रवास या नाटकातून मांडला आहे. या नाटकाच्या माध्यमातून सासू-सुनेच्या प्रेमाची कहाणी पाहता येईल.

"रूथ'ची मुख्य भूमिका शारोन पिल्ले ही साकारत आहे. नामीच्या भूमिकेत प्रियांका सोरेस या आहेत. फेथ ग्रुपच्या अन्य 50 कलावंतांनी या नाटकात सहभाग घेतला आहे. गेली सहा वर्षे त्यांचा हा स्तुत्य उपक्रम सुरू आहे. ग्रुपचे पिंपरी-चिंचवडसह पुणे-मुंबई, नाशिक, पुणतांबा, नगर, कोलकता येथील कलाकार नाटक सादर करणार आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ते सराव करीत आहेत.

"पौराणिक, ऐतिहासिक किंवा सामाजिक विषयांवरील नाट्यप्रयोग नेहमीच ठिकठिकाणी पाहायला मिळतात. मात्र, ख्रिस्ती समाजातून असे प्रयोग होत नाहीत. त्यासाठी आमच्या संस्थेच्या माध्यमातून विनामूल्य प्रयोग आम्ही करत आहोत. या नाटकाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा.''
- नोएल व्हॅनहॉल्ट्रन, संस्थापक, फेथ ग्रुप

Web Title: Ruth a play by Faith group