

Determination Pays Off: Rutuja Bhalerao Cracks Exam, Ranked 5th in State
Sakal
घोडेगाव : जिद्द,मेहनत सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल तर स्वप्नांचा पाठलाग करणे सहज शक्य असते आणि या मार्गाने जेव्हा एखादं स्वप्न प्रत्यक्ष सत्यात उतरतं, तेव्हा होणारा आनंद हा वेगळाच असतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२४ मध्ये घेतलेल्या कृषीसेवा स्पर्धा परिक्षेचा निकाल १० फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. यामध्ये ऋतुजा रोहदास भालेराव हिने राज्यात मुलींमध्ये पाचवे स्थान पटकावत कृषी उपसंचालक पदाला गवसणी घातली. प्रशासकीय सेवेचे उराशी बाळगलेले स्वप्न सत्यात उतरवण्यास ऋतुजा यशस्वी झाली. विशेष म्हणजे शिनोली सारख्या ग्रामीण आदिवासी भागात शिक्षण घेत,कोणताही खाजगी क्लास न लावता केवळ सेल्फ स्टडी करून तिने हे यश मिळवले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.