#SaathChal भेटी लागी जीवा...

अभय जोशी
रविवार, 1 जुलै 2018

पावसाळा सुरू झाल्यावर समस्त वारकऱ्यांना व भाविकांना ओढ लागते ती पंढरीची. या महिनाअखेरीस आषाढी एकादशी असून, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्‍वर यांच्या पालख्यांसह अनेक पालख्या पंढरपूरकडे प्रस्थानाच्या तयारीत आहेत. वारकऱ्यांना पंढरपूर भेटीचे व पंढरपूरकरांना वारकरी भेटीचे वेध लागले असून, दोन्हीकडे ‘भेटी लागे जीवा’ हीच स्थिती आहे. आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या तयारीचा घेतलेला वेध....

पावसाळा सुरू झाल्यावर समस्त वारकऱ्यांना व भाविकांना ओढ लागते ती पंढरीची. या महिनाअखेरीस आषाढी एकादशी असून, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्‍वर यांच्या पालख्यांसह अनेक पालख्या पंढरपूरकडे प्रस्थानाच्या तयारीत आहेत. वारकऱ्यांना पंढरपूर भेटीचे व पंढरपूरकरांना वारकरी भेटीचे वेध लागले असून, दोन्हीकडे ‘भेटी लागे जीवा’ हीच स्थिती आहे. आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या तयारीचा घेतलेला वेध....

दरवर्षी आषाढी यात्रेच्या तयारीसाठी पालकमंत्र्यांपासून जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार असे सर्वजण बैठका घेतात. परंतु, मुख्यमंत्री आषाढीची शासकीय महापूजा करून रवाना झाल्यावर सर्व यंत्रणा सुस्त होते.

प्रमुख अधिकारीदेखील यात्रा संपली, असे समजून त्यांच्या मुख्यालयात परततात. परिणामी यंत्रणा ढिसाळ होते आणि वारकऱ्यांना गैरसोयींना सामोरे जावे लागते. यंदा असे चित्र दिसू नये, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व जिल्हा पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनी पौर्णिमेपर्यंत पंढरपुरात तळ ठोकून राहावे आणि यात्रेतील व्यवस्थेवर जातीने लक्ष द्यावे, अशी मागणी ‘सकाळ’मधून करण्यात आली होती. त्याची दखल जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी घेतली. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी पंढरपुरात मुक्कामास राहून पौर्णिमेपर्यंत सर्व यंत्रणा दक्ष राहील याची काळजी घेणार असल्याचे जाहीर केले आहे. खड्डे बुजविण्यासाठी कचखडी टाकली जाते, त्यामुळे अनवाणी नगरप्रदक्षिणा करताना वारकऱ्यांना त्रास होतो. याकडे ही ‘सकाळ‘मधून लक्ष वेधण्यात आले होते. त्याची दखल घेऊन यंदा कचखडी टाकली जाणार नाही आणि यात्रेपूर्वी आम्ही प्रमुख अधिकारी अनवाणी प्रदक्षिणा रस्त्यावरून फिरून पाहणी करू असेही जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. कोणीही दुर्लक्ष केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला आहे.

पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यंदा सलग चौथ्या वर्षी आषाढी यात्रेच्या बंदोबस्ताचे नेतृत्व करणार आहेत. त्यांनीही यंदा अधिक काळजीने बंदोबस्ताची तयारी केली आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चंद्रभागेचे पात्र स्वच्छ करावे, नदीत आषाढी एकादशीच्या आठ दिवस आधीपासून पुरेसे पाणी असावे, अतिक्रमणामुळे वारकऱ्यांना चालणे मुश्‍कील होते, हे लक्षात घेऊन अतिक्रमणे काढावीत, विक्रेत्यांकडून जागोजागी ध्वनिक्षेपकावरून केले जाणारे ध्वनिप्रदूषण रोखावे, पालखी मार्गावरील खड्डे बुजवावेत, ऐन यात्रेत वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार यंदा होऊ नये, वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी वाहतूक पोलिस जास्त संख्येने नेमावेत आदी सूचना करण्यात आल्या. त्याची दखल घेऊन प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. तथापि अतिक्रमणे अजूनही ‘जैसे थे’ आहेत. शहरातील काही रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत, ती येत्या चार दिवसांत थांबवून यात्रेनंतर पुढील कामाला सुरवात केली जाणार आहे.

श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीकडून वर्षानुवर्षे यात्रेच्या वेळी केवळ रांगेसाठी लाकडी बॅरिकेटींग उभे करण्याचे काम केले जात असे. पंढरपूर नगरपालिकेलाच स्वच्छता, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, आरोग्य अशी जबाबदारी सांभाळावी लागत होती. मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी गेल्या वर्षभरात अनेक चांगले निर्णय घेतले. मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आणि वाळवंटाच्या वर्षभर स्वच्छतेसाठी त्यांनी खासगी ठेकेदाराची समितीच्या माध्यमातून नियुक्ती केल्याने ठेकेदाराचे शंभर स्वच्छता कर्मचारी येत्या आषाढीत संबंधित परिसराची अहोरात्र स्वच्छता करणार आहेत. कायमस्वरूपी बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची संख्या वाढली आहे. त्यामुळे यंदा यात्रेत तुलनेने नेहमीपेक्षा चांगली स्वच्छता दिसणार आहे.

श्री विठ्ठलाचे वर्षभराचे नित्योपचार
   पहाटे ४ - मंदिर भाविकांसाठी खुले
   पहाटे ४.१५ ते ६ - काकडआरती आणि नित्यपूजा
   सकाळी ११ ते ११.१५ - महानैवेद्य
   दुपारी ४.३० ते ५ - पोशाख
   सायंकाळी ७ ते ७.३० - धुपारती
   रात्री ११.४५ ते १२.४५ - शेजारती आणि तुळशी अर्चन

भेटी लागी जीवा लागलीसे....
भेटी लागी जीवा लागलीसे आस।
पाहे रात्रं दिवस वाट तुझी ।। १।।
      पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन ।
      तैसें माझें मन वाट पाहें ।। २ ।।
दिवाळीच्या मुळा लेंकी आसावली ।
पाहतसे वाटुली पंढरीची ।। ३ ।।
      भुकेलिया बाळ अति शोक करी
      वाट पाहे परि माउलीची ।। ४ ।।
तुका म्हणे मज लागलीसे भूक
धांवुनि श्रीमुख दावीं देवा ।। ५ ।।

Web Title: #SaathChal Pandharichi Wari Palkhi Timetable 2018