#SaathChal पालखी सोहळ्याला वरुणराजाचीही साथ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

पुणे - संत ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषाने आसमंत व्यापलेला असताना वरुणराजानेही त्याला साथ दिली. वारकऱ्यांची पाऊले विठ्ठल भेटीसाठी पुढे पडू लागली आणि भल्या पहाटेपासून आभाळही दाटून आले. वारकऱ्यांचे जथ्थे पुढे सरकत होते, तसे पावसाने भरलेले ढगही त्यांच्याबरोबरीने सरकू लागले... अखेर विठुनामाचे भजन आणि टाळ-मृदंगांच्या निनादाची सम त्याने गाठलीच. काही वेळ स्वर-तालांबरोबरच त्याने जुगलबंदीही केली आणि पंढरीच्या दिशेने चाललेली भक्‍तींची पाऊले चिंब भिजवून टाकली.  

पुण्यातील मुक्कामानंतर दोन्ही पालख्यांनी पुढील प्रवासाची सोमवारी प्रस्थान ठेवले. हा सोहळा अनुभवण्यासाठी भाविक सकाळी लवकरच घरातून बाहेर पडले होते. पावसाची शक्‍यता लक्षात घेऊन बहुतांश नागरिकांनी मुलांसाठी छोट्या छत्र्या आणि रेनेकोटसारख्या वस्तू बरोबर घेतल्या. दोन्ही पालख्या दुपारी बाराच्या सुमारास हडपसरमध्ये दाखल झाल्या. त्याचवेळी सकाळपासून दाटलेले आभाळ बरसू लागले.  संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या मागे असलेल्या दिंड्या रामटेकडी येथील उड्डाण पुलावर पोचल्या. त्याचवेळी पावसाच्या रिमझिम सरी बरसू लागल्या. सर्वांनी त्यात भिजण्याचा आनंद घेतला. तरुण-तरुणींसह लहान मुलेही पावसात भिजत होती. हळूहळू पावसाचे टपोरे थेंब अंगावर पडू लागले आणि सगळ्यांनीच पिशवीतून छत्र्या, रेनकोट वस्तू बाहेर आल्या. दिंडीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी त्यांच्याजवळील रंगीबेरंगी इरले पांघरून पावसापासून बचाव करीत पुढे चालण्यास सुरवात केली.

Web Title: #SaathChal Wari Palkhi rain tukaram maharaj dnyaneshwar maharaj