संसाराचा आर्थिक गाडा बायकोच्या खांद्यावर; मला कोरोनाची लागण झाली अन्.....

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जुलै 2020

नागरिकांनी तोंडाला मास्क लावूनच बाहेर पडले पाहिजे. शारीरिक अंतराचे पालन करत हात साबणाने वेळोवेळी स्वच्छ धुवायला हवे. कोरोना झाला तरी घाबरायला नको. औषधे आणि योग्य खबरदारी घेतली तर आपण लवकरच बरे होतो. 
- सचिन कांबळे

पुणे - पुण्यात येऊन जेमतेम दीड वर्ष झालेले. नुकतीच राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाल्यामुळे जिल्हा सत्र न्यायालयात नोकरी लागलेली. पण त्यातही कोरोनामुळे लॉकडाउन झालं अन जॉयनींगही लांबल. संसाराचा आर्थिक गाडा फक्त बायकोच्या खांद्यावर होता. अशा स्थितीत मला कोरोनाची लागण झाली अन होत्याचं नव्हतं झालं. परंतु सकारात्मक विचार कायम ठेवला, तर कोरोनावर सहज विजय मिळवता येतो, असा विश्वास सचिन अशोक कांबळे यांनी व्यक्त केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनावर मात करणाऱ्या कांबळे यांनी आपले अनुभव कथन केले. विशेष म्हणजे त्यांना सर्दी, ताप, खोकला अशी कोणतीच लक्षणे दिसत नव्हती. मात्र, कोणत्याही प्रकारचा वास येत नसल्याची बाब त्यांनी पत्नीला सांगितली. त्यामुळे दोघांनीही तातडीने कोरोनाची चाचणी करून घेतली. कारण, त्या स्वतः परिचारिका म्हणून राजमाता जिजाऊ रुग्णालयात कोरोना रुग्णांची सेवा करत होत्या. रिपोर्ट आला तर सचिन कोरोना पॉझिटिव्ह तर त्यांची पत्नी निगेटिव्ह होती. आर्थिक बाबींवर लढत असलेले सचिन या सर्व प्रकारामुळे मानसिकरित्या खचले होते. अशा वेळी त्यांच्या पत्नीने त्यांना धीर दिला. बालेवाडीतील कोरोना वॉर्डमध्ये सचिन दहा दिवसांसाठी दाखल झाले. 

पुणे जिल्ह्यात असा असणार लॉकडाऊन, प्रशासनाने जाहीर केली नियमावली

पहिले पाच दिवसच औषधे आणि पौष्टिक आहार घेतल्यामुळे, त्यांना तिसऱ्याच दिवशीच गंध ओळखता येऊ लागला. याबाबत ते म्हणाले, ‘‘कोरोना तर सर्दी, खोकल्यापेक्षा लवकर बरा होतो. मग त्याला घाबरायचे कशाला. स्वतःच स्वतःची काळजी घेतल्यास आणि सकारात्मक विचार ठेवल्यास कोरोनातून लवकर मुक्त होतो.’’ दहा दिवसांच्या उपचारानंतर सचिन यशस्वीरीत्या कोरोनातून बाहेर आले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sachin kamble corona affected lifestyle