#SafeDrive हे हेल्मेट नव्हे, तर जिवाशीच खेळ!

Self-Drive
Self-Drive

पुणे - पोलिसांनी केलेल्या हेल्मेट वापराच्या आवाहनाचे पुणेकरांनी स्वागत केले; परंतु काही दिवसांपासून शहरात दर्जाहीन हेल्मेट विक्रीचे पेव फुटले आहे. केवळ पोलिस कारवाईतून सुटका व्हावी, या एकाच भावनेतून वाहनचालक स्वस्तातील हे हेल्मेट विकत घेत आहेत. प्रत्यक्षात सुरक्षिततेची हमी असलेले हे हेल्मेट नव्हे, तर जिवाशीच खेळ आहे, असे जाणकारांचे मत आहे. हरियाना व दिल्लीतील दोन खासगी प्रयोगशाळा वगळता देशात हेल्मेटचा दर्जा तपासण्यासाठी सरकारी यंत्रणाच अस्तित्वात नसल्याची धक्कादायक स्थिती आहे.

भारतीय मानक ब्यूरोने (बीआयएस) ‘आयएस ४१५१’ मानकानुसार बनविलेले हेल्मेटला प्राधान्य दिले आहे. त्याप्रमाणे हेल्मेटची गुणवत्ता चाचणी होणे गरजेचे आहे. मात्र, ती करण्यासाठी सरकारची यंत्रणाच नाही. देशात पंचकुला (हरियाना) येथे इंटरस्टेलर टेस्टिंग सेंटर व नोएडा (दिल्ली) येथे टेस्टटेक्‍स इंडिया लॅबोरेटरीज या दोन खासगी कंपन्या हेल्मेट गुणवत्ता तपासणी करीत असल्याचे ‘बीआयएस’च्या संकेतस्थळावर दिले आहे.      

शहरात डिसेंबर २०१८ पासून रस्त्यांवर व ठिकठिकाणी हेल्मेट विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. हे दुकानदार  २०० ते ६०० रुपयांपर्यंत दर्जाहीन हेल्मेट विकून नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत. अशा पद्धतीने दर्जाहीन हेल्मेट बनवणारे उत्पादक अथवा विक्रेत्यांवर आजतागायत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. महापालिका रस्त्यावरील विक्री थांबवून तात्पुरस्त्या स्वरूपात माल जप्त करीत आहे; परंतु संबंधितांवर कायदेशीर कारवाई होत नसल्याचे वास्तव आहे. 

केवळ स्वस्त म्हणून... 
सर्व चाचण्या झालेल्या हेल्मेटची किंमत तीन हजार रुपयांपर्यंत जाते. इतके महागडे हेल्मेट नागरिक घेत नाहीत. कंपन्या निकृष्ट मालाचा वापर करून व चाचण्यांना फाटा देऊन स्वस्तातील हेल्मेट बाजारात आणतात. 

‘बीआयएस’ने आंतरराष्ट्रीय हेल्मेट मानकाशी तडजोड करून नवीन हेल्मेट मानक तयार केले. देशाला ३५ कोटी हेल्मेट पाहिजे असतील, तर त्याची तपासणी करणारी यंत्रणाच सरकारकडे नाही. हेल्मेट घातल्याने पोलिसांचे व वाहनचालकांचे समाधान होईल. पण, त्यांच्या सुरक्षिततेचे काय? 
- राजेंद्र कोंढरे, सदस्य, हेल्मेटसक्ती विरोधी कृती समिती

हेल्मेट दर्जाहीन असेल आणि त्यावर ‘आयएसआय’चा उल्लेख करून बनावट हेल्मेट विक्री होत असेल, तर विक्रेत्यांविरुद्ध नागरिक पोलिसात तक्रार करू शकतात.
- तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

हेल्मेटसक्तीविरोधात आज घंटानाद आंदोलन
पुणे - हेल्मेटसक्तीच्या नावाखाली नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत वाहतूक पोलिस गुंडगिरी करत आहेत. त्यात रात्रीबेरात्री गाड्या जाळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गरजेच्या ठिकाणी वाहतुकीबाबत कारवाई करण्यात येत नाही. याविरोधात हेल्मेटसक्तीविरोधी कृती समितीतर्फे शुक्रवारी (ता. १) सकाळी १० वाजता मंडईतील टिळक यांच्या पुतळ्यासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पतित पावन संघटनेचे सीताराम खाडे, गणेश ठाकर, गणेश मापारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com