पुस्तकांच्या गावी साहित्य सम्राटचे कवी संमेलन

कृष्णकांत कोबल
रविवार, 2 सप्टेंबर 2018

श्रावण महिन्यातील हिरव्यागार निसर्गाची पार्श्वभूमी, ऊन  सावल्यांचा आल्हाददायक खेळ आणि रानकविंकडून सादर होत असलेल्या मनमोहक काव्य रचना यामुळे हे संमेलन उत्तरोत्तर रंगत गेले. प्रा. ल. बा. महामने यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन झाले.

मांजरी : भारतातील पहिले पुस्तकांचे गाव भिलार येथे हडपसरच्या साहित्य सम्राट संस्थेचे ९७ वे कवी संमेलन रंगले. संस्थेच्या पाचव्या साहित्यिक श्रावण सहलीचे भिलार येथे आयोजन केले होते. त्यानिमित्ताने हे संमेलन येथे घेण्यात आले.

श्रावण महिन्यातील हिरव्यागार निसर्गाची पार्श्वभूमी, ऊन  सावल्यांचा आल्हाददायक खेळ आणि रानकविंकडून सादर होत असलेल्या मनमोहक काव्य रचना यामुळे हे संमेलन उत्तरोत्तर रंगत गेले. प्रा. ल. बा. महामने यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन झाले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ यांच्यासह संमेलनात जेष्ठ कवी किशोर टिळेकर,अप्पा फुले, संध्या गोळे, कविता काळे, डॉ. पांडुरंग बाणखेले, शाम लाटकर, सिताराम नरके, सूर्यकांत नामुगडे, प्रल्हाद शिंदे, जयवंत हापन, सुभाष पवार, सोनल बासरकर, आनंद गायकवाड, ह.भ.प. बडधे महाराज, अंकुश जगताप, दत्तात्रय कुलकर्णी, कविता गायकवाड, दादाभाऊ गावडे, दिपाली लोंढे यांनी आपल्या कविता सादर केल्या. 

संमेलनाध्यक्ष प्रा. महामने म्हणाले, 'इतर ठिकाणी अनुदानित ग्रंथालयात पुस्तकांची कपाटे कुलूपे लावून गंजलेली दिसतात. भिलारमध्ये मात्र पुस्तकाला आस्थेने जपणारे, देव मानणारे लोक आहेत. हे संमेलन नामांकित साहित्यिकांच्या सदा बहार कला, अभिनय आणि गायन स्वरूपाने कायमस्वरूपी हृदयावर कोरणारे ठरेल.'

मराठी साहित्य कवितेच्या रूपाने समृध्द करण्यासाठी प्रयत्न करीत असल्यामुळे व भिलारमध्ये कवी संमेलन आयोजित केल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष अष्टुळ यांचा यावेळी प्रसिद्ध एकपात्री कलावंत व काव्य अभिनयकर्ते प्रा. अशोक शिंदे यांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला. एस. जी. फिल्मचे राहुल जाधव, प्रकल्प विभागाचे प्रमुख, कर्मचारी आणि पर्यटक यावेळी उपस्थित होते.
 

Web Title: Sahitya Sammelan At Manjari