Sakal Anniversary : ‘सकाळ’च्या ९२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यास पुणेकरांची अलोट गर्दी

नऊ दशकांहून अधिक काळ पुणेकर वाचकांनी ‘सकाळ’शी जपलेल्या स्नेहबंधाचे हृद्य दर्शन घडविणारा सोहळा सोमवारी (ता. १) रंगला.
Sakal 92th Anniversary Celebration
Sakal 92th Anniversary Celebrationsakal

पुणे - नऊ दशकांहून अधिक काळ पुणेकर वाचकांनी ‘सकाळ’शी जपलेल्या स्नेहबंधाचे हृद्य दर्शन घडविणारा सोहळा सोमवारी (ता. १) रंगला. ‘सकाळ’च्या ९२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यास पुणेकरांनी अलोट गर्दी केली. विविध क्षेत्रांतील मान्यवर, ‘सकाळ’चे हितचिंतक आणि वाचकांनी ‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. गरमागरम कॉफी अन् मनसोक्त गप्पांसह रंगलेल्या स्नेहमेळाव्याने ‘सकाळ’ आणि पुणेकरांचे ऋणानुबंध अधिकच दृढ झाल्याची ग्वाही दिली.

पुणेकरांचे ‘सकाळ’शी असलेले जिव्हाळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. आपल्या विश्वासार्हतेने पुणेकरांच्या मनात खास स्थान निर्माण केलेल्या ‘सकाळ’ने यंदा ९३व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्त बुधवार पेठ कार्यालयाच्या प्रांगणात स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. नववर्षाचे स्वागत जल्लोषात केल्यानंतर पुणेकरांची पावले ‘सकाळ’च्या कार्यालयाकडे वळली. सायंकाळी साडेपाचपासूनच प्रांगणाचा परिसर गर्दीने फुलला होता.

एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत आणि ख्यालीखुशाली विचारत मैत्र दृढ झाले. रात्री उशिरापर्यंत आनंददायी सोहळा रंगला.

स्नेहमेळाव्याला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, प्रशासकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. जुन्या-नव्या पिढीचा संगम, बालवाचकांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत, सर्व वयोगटांतील वाचकांची उपस्थिती, ही ‘सकाळ’च्या पुणेकरांच्या जीवनाशी असलेल्या अतूट नात्याचे दर्शन घडवणारी ठरली.

यावेळी ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, ‘सकाळ माध्यम समूहा’च्या संचालिका मृणाल पवार, संपादक सम्राट फडणीस, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ यांनी पुणेकरांची भेट घेत त्यांचे स्वागत केले.

या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, खासदार वंदना चव्हाण, आमदार रवींद्र धंगेकर, सुनील कांबळे, सुनील टिंगरे, पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार, संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, शारदा ज्ञानपीठमचे पंडित वसंतराव गाडगीळ, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, उच्चशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्नेहमेळाव्यास आवर्जून उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

उत्कट भेटीचा स्नेहमेळावा -

‘सकाळ’ म्हणजे पुणेकरांच्या हक्काचे व्यासपीठ. मागील ९२ वर्षांपासून पुणेकरांच्या नववर्षाची सुरुवात ‘सकाळ’च्या वर्धापन दिन स्नेहमेळाव्याने होते. त्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांपासून ते उच्चपदस्थ अधिकारी, साहित्यिक, शास्त्रज्ञ, राजकारणी, कलाकार, शेतकरी, उद्योगपती, विद्यार्थी, समाजसेवक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उत्कट स्नेहभेटीचे हे हक्काचे ठिकाण.

जगात कुठेही असलो, तरी एक जानेवारीला ‘सकाळ’साठी आम्ही पुण्यात नक्की येतो, असे आवर्जून सांगणारे वाचक हीच ‘सकाळ’च्या विश्वासार्हतेची पावती. ‘सकाळ’च्या स्नेहमेळाव्यातच आपली पहिली भेट झाली, असे म्हणणारे अनेक दिग्गज आजही दरवर्षी आवर्जून उपस्थित राहतात. जुन्या-नव्या मित्रांच्या स्नेहभेटीची मैफील उत्तरोत्तर रंगत गेली.

डॉ. माशेलकरांभोवती विद्यार्थ्यांचा गराडा

‘सकाळ’चे वाचक आणि लेखक असलेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी स्नेहमेळाव्याला आवर्जून भेट दिली. त्यांच्या उपस्थितीने विद्यार्थी अक्षरशः भारावून गेले. त्यांच्यासमवेत छायाचित्र काढण्यापासून ते त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी विद्यार्थी आणि पुणेकरांनी गर्दी केली होती.

चित्रफितींनी वेधले लक्ष

वर्धापनदिनानिमित्त ‘सकाळ’ कार्यालयाच्या प्रांगणात खास एलईडी स्क्रीन लावला होता. यावर ‘सकाळ’च्या स्वास्थ्यम्, स्कूलिंपिक, सहकार परिषद, पुणे हाफ मॅरेथॉन आदी उपक्रमांच्या चित्रफिती दाखविण्यात येत होत्या. ‘सकाळ’ची सामाजिक बांधिलकी दर्शविणाऱ्या उपक्रमांच्या चित्रफितींनी उपस्थितांचे लक्ष वेधले, तसेच ‘सकाळ’चे संस्थापक डॉ. ना. भि. परुळेकर यांच्या अर्धपुतळ्याभोवती काढलेली सुरेख रांगोळी, इमारतीस केलेली आकर्षक विद्युत रोषणाई, सेल्फी पॉइंट आदी गोष्टी विशेष आकर्षण ठरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com