रंगरेषांनी उलगडले विद्यार्थ्यांचे भावविश्‍व

रंगरेषांनी उलगडले विद्यार्थ्यांचे भावविश्‍व

पिंपरी - रविवार सुटीचा दिवस. तरीही दप्तर पाठीवर टाकून मुलांची पावले शाळांकडे वळत होती. परंतु तासिकाप्रमाणे नोटबुक, पुस्तकांऐवजी त्यात होते चित्र रंगविण्याचे साहित्य. पॅड, कंपास पेटी, कलर बॉक्‍स, खाऊचा डबा आणि पाण्याची बोटल. सकाळचे कोवळे ऊन अंगावर झेलत. काहींनी शाळेचा गणवेश परिधान केलेला, तर काहींना आवडीचा ड्रेस.

काही मित्रांसोबत तर काही मम्पी-पपांसोबत. कारण, त्यांना ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’त सहभाग घ्यायचा होता. त्या-त्या शाळेतील शिक्षक व स्वयंसेवकांनी विद्यार्थ्यांना ओळीत बसविले आणि चित्ररंगविण्यासाठीचे कागद व प्रश्‍नपत्रिका त्यांच्या हातात पडली. हळूहळू पेन्सिलने रेखांकन सुरू झाले. चित्र रेखाटले गेली आणि विविध रंगात रंगवूनही. अवघ्या दीड तासात. त्यातून मुलांचा आत्मविश्‍वास, रंगसंगतीचे ज्ञान, बुद्धिमत्ता दिसून आली. 

‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स लिमिटेड प्रस्तृत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धा २०२०’ रविवारी शहरासह मावळातील प्रमुख शाळांमध्ये रंगली. रंग, रेषा, छटांच्या माध्यमातून पहिलीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे इंद्रधनू खुलवत त्यांना व्यक्त होता आले. प्रत्येक परीक्षा केंद्रावर मुलांसह पालकांची गर्दी जमू लागले किलबिलाटाने प्रांगणे फुलून गेली होती. बोलके चित्र साकारून रंगवली जाऊ लागली. पिंपरी-चिंचवड शहरातील ३६ आणि मावळ तालुक्‍यातील पाच केंद्रांवर स्पर्धा घेण्यात आली. मराठी, इंग्रजी व हिंदी माध्यमांसह विशेष मुलांच्या शाळांमधूनही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिली व दुसरी, तिसरी व चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा चार गटांत स्पर्धा झाली. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गट सकाळी नऊ ते साडेदहा आणि पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी अकरा ते दुपारी साडेबारा अशी वेळ होती. काही शाळांनी ‘सकाळ’ अक्षराची प्रतिकृती साकारून विद्यार्थी बसविले होते. 

मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, असे पालकांना वाटते. खूप कमी प्रमाणात विद्यार्थ्यांच्या सृजनतेला चालना देण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा भरविल्या जातात. ‘सकाळ’ने हा उपक्रम राबवून खूप मोलाचे काम केले आहे. वर्षातून एकदा स्पर्धा भरविण्यापेक्षा सहा किंवा तीन महिन्यांतून नक्कीच असा उपक्रम राबविण्यात यावा.
- संजना सारसकर, पिंपळे गुरव, पालक 

चित्रकला स्पर्धेचा आनंद घेतला. चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून विविध चित्रे आणि रंगछटा काढण्याची आवड निर्माण झाली. 
- दीप्ती शिंदे, विद्यार्थिनी, रामचंद्र गायकवाड विद्यालय, दिघी

 ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अनुभव मिळाला. त्याचप्रमाणे चित्रकलेसाठी एक व्यासपीठही निर्माण झाले आहे.
- प्रशांत सोनवणे, पालक

केक, पतंग, मॅरेथॉन अन्‌ बरंच काही...
पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांच्या चिमुकल्या हातांच्या बोटांनी पकडलेल्या पेन्सिलीतून ‘फुलपाखरू’, ‘केक’, ‘आवडता प्राणी’, ‘मोटू और पतलू’, ‘विदूषक’, ‘आजी’ यांची चित्रे साकारली गेली. तिसरी-चौथीच्या विद्यार्थ्यांनी ‘पाळीव प्राण्याबरोबर खेळतात’, आकाशातील पतंग’, ‘वाढदिवस पार्टी’, ‘मी आणि माझे आवडते कार्टून’, ‘उंटावरून किंवा हत्तीवरून रपेट’, ‘किल्ला’ या विषयांवरील चित्र काढून रंगवली. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘पाण्याखालची जीवसृष्टी’, ‘मॅरेथॉन’, ‘शेकोटीभोवतालचे दृश्‍य’, ‘संगीत कॉन्सर्ट’, ‘वृक्षारोपण’, आणि ‘रेल्वे स्टेशनवरील दृश्‍य’ आणि आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सुरक्षा विषयावर भित्तीपत्रक’, ‘साहसी खेळ’, ‘निवडणूक प्रचार’, ‘रोबो कार्यशाळा’, ‘भौमितिक आकाराचे डिझाईन पॅटर्न’, ‘भारतीय आंतराळ मोहीम चांद्रयान’ असे चित्र साकारण्याचे विषय होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com