करिअरबाबत शंकांचे निरसन

करिअरबाबत शंकांचे निरसन

पुणे - गेले तीन दिवस उच्च शिक्षण आणि करिअरविषयक मार्गदर्शन करणाऱ्या ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’चा रविवारी समारोप झाला. यात शेकडो विद्यार्थी आणि पालकांच्या शंकांचे निरसन झाले. एकाच छताखाली शिक्षणाच्या सर्व वाटांची माहिती मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

युनिक ॲकॅडमी या एक्स्पोचे मुख्य प्रायोजक होते. उपप्रायोजक मराठवाडा मित्र मंडळ आणि झील एज्युकेशन सोसायटी; तर सहप्रायोजक सृजन कॉलेज ऑफ डिझाईन व संदीप युनिव्हर्सिटी हे होते. विविध शिक्षण संस्थांचे स्टॉल या प्रदर्शनात होते. तेथे जाऊन असंख्य विद्यार्थी करिअरच्या वाटा निवडत होते. कला, वाणिज्य, अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र, डिझाईन, फार्मसी, माहिती-तंत्रज्ञान अशा असंख्य अभ्यासक्रमांची माहिती एकाच छताखाली मिळाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. प्रदर्शनाच्या समारोपाच्या दिवशी युनिक ॲकॅडमीचे पंकज व्हट्टे यांचे स्पर्धा परीक्षांबाबत आणि करिअर समुपदेशक अभय अभ्यंकर यांनी अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. मनोहर पाटील आणि मराठवाडा मित्र मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीचे (लोहगाव) प्राचार्य रूपेश भोरटक्के यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या प्रदर्शनात करिअरची माहिती मिळाली. तसेच विविध सेमिनारमधून तज्ज्ञांचे सविस्तर मार्गदर्शन मिळाले.
- सेजल अमराळे, विद्यार्थी

एज्युकेशन एक्‍स्पो हा छान उपक्रम आहे. त्यामुळे आमच्या पालकांनासुद्धा आमच्यासाठी वेळ देता येतो.
- यश वायचळ, विद्यार्थी

*******************************

‘स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्‍वासाची गरज’
स्वारगेट : स्पर्धा परीक्षेला किती विद्यार्थी बसतात, या संख्येला न घाबरता विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आत्मविश्वास, मेहनत, चिकाटी या गुणांवर विश्वास ठेवून या क्षेत्रात करिअर करावे, असे ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’मध्ये विद्यार्थ्यांना ‘यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेतील करिअर’ या विषयावर मार्गदर्शन करताना पंकज व्हट्टे यांनी सांगितले.

भारतातली सर्वांत अवघड ही परीक्षा आहे. पण, नियोजनबद्ध अभ्यास केला व संयम पाळला, तर यश नक्की मिळते. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही केंद्रीय पातळीवर घेतली जाते; तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ही राज्यपातळीवर घेतली जाते. ही परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते. त्यामध्ये पूर्वपरीक्षा, मुख्य आणि मुलाखत असे तीन टप्पे असतात. या प्रक्रियेला एक वर्ष जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांची ही संयमाची परीक्षा आहे. ही परीक्षा फक्त तुमच्या ज्ञानाची नसून, तुमच्या व्यक्तिमत्त्वाची देखील आहे. तुमच्यामध्ये आव्हाने पेलण्याची ताकद आहे का, तुम्ही कोणत्या प्रसंगाला कोणत्या प्रकारे सामोरे जाऊ शकता, तुम्ही जगाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता, या सर्व बाबी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. तुमचे व्यक्तिमत्त्व हे अष्टपैलू पाहिजे. कारण, प्रशासकीय क्षेत्रात काम करताना अनेक प्रश्‍न हे अचानकपणे आपल्यासमोर उभे राहतात. ते बऱ्याचदा अनोळखी असतात. ते सोडविता आले पाहिजेत, असे व्हट्टे यांनी सांगितले.

*******************************

अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेतील बदल समजून घ्या : अभ्यंकर
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा या वर्षी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या (डीटीई) संकेतस्थळावरून होणार नाही. तरीही विद्यार्थ्यांनी गोंधळू नये. या प्रक्रियेत किरकोळ बदल आहेत, ते समजून घेऊन प्रक्रिया पूर्ण करावी, असा सल्ला करिअर समुपदेशक अभय अभ्यंकर यांनी दिला. 

प्रवेशप्रक्रियेसाठी ‘सार’ नावाने पोर्टल आहे. तिथे साइन अप करावे लागते. यापूर्वी डीटीईच्या संकेतस्थळावरून ही प्रक्रिया होत होती. या प्रवेशप्रक्रियेचे नोटिफिकेशन दोन दिवसांत येणे अपेक्षित आहे. या प्रक्रियेसाठी तारखा महत्त्वाच्या असतात. त्या नोटिफिकेशनमध्ये असतील. या वर्षी सीईटीच्या निकालाबाबतही गोंधळ आहे. पर्सेंटाइल पद्धत असल्याने तुम्हाला किती गुण पडले, याला महत्त्व नाही. पर्सेंटाइलवर तुमची रॅंक ठरणार आहे; पण पर्सेंटाइल आहे म्हणून घाबरून जाऊ नका. ही प्रक्रिया पूर्ण करताना डीटीईच्या संकेतस्थळांवर गेल्या वर्षीचे कटऑफ दिलेले आहेत. ते डाउनलोड करून घ्या. तुमचे गुण त्याच्याशी पडताळून पाहा. त्यानुसार जी महाविद्यालये तुम्हाला आवडतील, ती पाहून या. महाविद्यालय निवडण्यासाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम देताना तुम्हाला वाटेल, तसे द्या; पण ज्या महाविद्यालयात जायचे आहे, त्याचे स्थान वरचे ठेवा. ही ‘विश लिस्ट’ असल्याने ज्या महाविद्यालयांमध्ये जायचे आहे, ते आधीच निश्‍चित करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com