जम्बो कोविड सेंटरने भूक-भूक करून मारले हो...

rajani khedekar
rajani khedekar

पुणेः जम्बो कोविड सेंटरमध्ये मोठ्या अपेक्षेने रुग्णाला भरती केले. पण, भरती केल्यानंतर गोळ्या आणि जेवण वेळेवर मिळाले नाही. घरून पाठविलेली फळेही रुग्णापर्यंत पोहचली नाहीत. रुग्णालयात चालत गेलेला रग्ण दुसऱयाच दिवशी गेला म्हणून सांगण्यात आले. भूक-भूक करून आमचा रुग्ण मारला हो..., अशी तक्रार रुग्णाचे नातेवाईक वसंत खेडेकर यांनी केली.

रजनी वसंत खेडेकर असे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाचे नाव आहे. पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 16 च्या काँग्रेसच्या त्या महिला अध्यक्षा होत्या. रजनी खेडेकर यांचे पती वसंत खेडेकर यांनी सांगितले की, रजनी यांना थंडी, ताप, खोकला अशी कोणतीही लक्षणे नव्हती. केवळ अशक्तपणा जाणवत असल्यामुळे नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोना चाचणी केली आणि अहवाल पॉझिटिव्ह आला. नायडू हॉस्पिटलमधून त्यांना पुढील उपचारासाठी 30 ऑगस्ट रोजी जम्बो कोविड सेंटरमध्ये पाठविण्यात आले. जम्बो रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी दोन तास रुग्णवाहिकेमध्ये बसून राहावे लागले. प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रुग्ण सर्वांशी बोलत आणि चालत आतमध्ये गेला होता. रुग्णालयात दाखल झाल्यामुळे आम्ही पण निर्धास्त झालो होतो. शिवाय, रुग्णाजवळ मोबाईल असल्यामुळे बोलणे होत होते.

दुसऱया दिवशी रुग्णाने जेवण चांगले मिळत नसल्याचे सांगितले. शिवाय, फळे आणि अगोदर पासून सुरू असलेल्या बीपीच्या गोळ्यांची मागणी केली. त्यानुसार एका पिशवीत गोळ्या आणि फळे पाठवली. पण, रुग्णापर्यंत पोहचलीच नाहीत. रुग्ण सतत फोनवरून भूक-भूक करत होते. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे कोणाकडे चौकशी करावी तर कोणी काही सांगत नव्हते. शिवाय, बाऊंसर ठिकठिकाणी आडवत असल्यामुळे प्रवेशही करता येत नव्हता. आमचा रुग्ण खायला मागत असल्यामुळे आम्ही हतबल झालो होतो. प्रवेशद्वाराच्या बाहेर थांबण्याशिवाय काहीच करता येत नव्हते. दुपारी एक वाजेपर्यंत रुग्णाशी फोनवरून बोलणे चालू होते. पुढे फोन घेणे बंद झाले. फळे आणि गोळ्या खावून रुग्ण झोपला असावा, असे आम्हाला वाटले. पण, संध्याकाळी सातच्या सुमारास फोन आला आणि रुग्णाची परिस्थिती नाजूक असल्याचे सांगण्यात आले. हे ऐकून आम्हाला धक्काच बसला. आम्ही रुग्णालयात गेल्यानंतर कोणी काही सांगायला तयार नव्हते. डॉक्टरचा फोन लागत नव्हता. पुन्हा डॉक्टरचा फोन आला आणि रुग्ण गेल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांचे बोलणे ऐकून धक्काच बसला. दुपारपर्यंत फोनवर बोलत असलेला रुग्ण भूक-भूक करून गेला.

मृतदेह घेण्यासाठी गेल्यानंतर कोणी काही सांगत नव्हते. मृतदेह कोठे आहे, याबाबतची माहितीही कोणाला नव्हती. आम्हालाच मृतदेह शोधण्यासाठी सांगण्यात आला. यावेळी काऊंटरच्या बाहेर आमची फळ आणि गोळ्यांची पिशवी पडलेली दिसली. फळ आणि गोळ्या वेळेवर मिळाल्या असत्या तर आमचा रुग्ण वाचला असता. कोविड सेंटरमध्ये प्रवेश केल्यानंतर आतमधील परिस्थिती पाहून अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला. कोविड सेंटर आणि प्रशासनाच्या गलथान कारभारामुळेच आमच्या रुग्णाचा जीव गेला आहे, असे खेडेकर यांनी सांगितले.

- रुग्णापर्यंत फळे आणि गोळ्या पोहचल्या नाहीत
- रुग्णाला चांगले आणि वेळेवर जेवण मिळाले नाही
- रुग्णाला परत भेटू दिले नाही
- दीड दिवसात रुग्णाचा गेला जीव
- मृतदेह मिळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली
- कोविड सेंटरमध्ये उपचार करणाऱयांऐवजी बाऊंसरचाच भरणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com