उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

पुणे - हीरक महोत्सवाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सकाळ इंडिया फाउंडेशनने या वर्षीही उच्च शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांकडून बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविले आहेत. फाउंडेशनतर्फे ५५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ६० हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

पुणे - हीरक महोत्सवाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सकाळ इंडिया फाउंडेशनने या वर्षीही उच्च शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांकडून बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविले आहेत. फाउंडेशनतर्फे ५५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ६० हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

भारतात पीएच. डी. करण्यासाठी किंवा परदेशी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना २०१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून ही शिष्यवृत्ती दिली जाते. देशाबाहेरील विद्यापीठांकडून किंवा संशोधन संस्थेकडून २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात किमान एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल्याबाबतचे लेखी पत्र मिळालेले भारतीय विद्यार्थी आणि भारतातील विद्यापीठांमध्ये किंवा राष्ट्रीय संशोधन संस्थेत पीएच.डी.चा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी संशोधन करणाऱ्या आणि त्यांना या विद्यापीठाचे-संशोधन संस्थेचे प्रवेश दिल्याचे २०१६ किंवा त्यापूर्वीचे लेखी पत्र प्राप्त झाले असेल अशांनाही ही शिष्यवृत्ती देण्यात येईल. या बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीच्या रकमेची परतफेड दोन वर्षांत करावयाची असते. 

वृत्तपत्र क्षेत्रातील पदव्युत्तर किंवा पीएच.डी.चे शिक्षण घेणाऱ्या, तसेच पात्रता अट पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही दहा हजार रुपयांची रक्‍कम परतफेड न करण्याच्या अटीवर मंजूर केली जाईल. 

पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या छापील अर्जाचा नमुना इतर जोडपत्रांसह ३१ मेपर्यंत पाठविला जाईल किंवा सकाळ कार्यालयात सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा या वेळेत समक्ष येणाऱ्यास या अर्जाचा नमुना जोडपत्रांसह देण्यात येईल. पूर्ण भरलेले छापील अर्ज १५ जूनपर्यंतच वरील कार्यालयात स्वीकारले जातील.  

पात्र विद्यार्थ्यांनी अर्जाबरोबर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाल्याच्या पत्राची झेरॉक्‍स प्रत तसेच दहा रुपयाचे पोस्टाचे तिकीट लावलेले, स्वतःचा पत्ता असलेले पाकीट खालील पत्त्यावर पाठवावे. 

कार्यकारी सचिव, 
सकाळ इंडिया फाउंडेशन
सकाळ कार्यालय, ५९५, बुधवार पेठ
पुणे - ४११००२ (महाराष्ट्र)
अधिक माहितीसाठी - ०२० - २४४०५८९५,९७,९४ या क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय sakalindiafoundation@esakal.com वर मेल करावा.

पात्र विद्यार्थ्यांना अर्जाचा छापील नमुना देण्याची अंतिम तारीख - ३१ मे २०१८
 संपूर्ण भरलेले अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख - १५ जून २०१८

Web Title: sakal india foundation scholarship for Higher Education Students