बेरोजगारीवर मात करण्यासाठी जर्मनीचे शिक्षण मॉडेल; अभिजित पवार यांनी मांडली संकल्पना

abhijit-pawar
abhijit-pawar

पुणे - ‘‘इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट करायचे असतात. विद्यार्थी कार, रोबो वगैरे बनवतात. महाविद्यालये, विद्यार्थ्यांनीही प्रकल्प म्हणून सभोवतालच्या समस्यांवर विचार केला पाहिजे, त्या सोडविल्या पाहिजेत,’’ अशी भूमिका सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी मांडली. 

‘‘महाविद्यालयाच्या परिसरातील खेडी, शहरे आणि नागरिक स्मार्ट बनविण्यासाठी शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी काम करावे. स्मार्ट म्हणजे समस्या सोडविणारे; निर्माण करणारे नव्हे. तुम्ही असे प्रोजेक्ट घ्या; आम्ही सर्वोतपरी मदतीसाठी तुमच्यासोबत उभे राहू.’’ अशी ग्वाही त्यांनी दिली. सांगली येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्सतर्फे (महाटीपीओ) आयोजित ‘नो गोईंग बॅक- पोस्ट कोव्हिड-१९’ या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये पवार बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण पद्धतीतील बदल, उद्योगांचे भवितव्य, रोजगार, पर्यावरण, विद्यार्थ्यांमधील सामाजिक भान आदी मुद्द्यांवर उदाहरणांसह पवार यांनी भविष्याचा वेध घेत भाष्य केले.

मार्गदर्शन अन्‌ अर्थार्जनही
वालचंद महाविद्यालयाचे उदाहरण घेऊन पवार म्हणाले, ‘‘ एखाद्या महाविद्यालयाने पुढाकार घेऊन आपल्या शहरातील अन्य महाविद्यालयांना एकत्र आणले पाहिजे. तेथील विद्यार्थी-शिक्षकांना एकत्र करून आसपासची खेडी, शहरांतील समस्यांचा अभ्यास करून त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. खेडी, शहरे आणि नागरिक स्मार्ट बनवा. त्यासाठी बहुशाखीय भूमिका ठेवा. वेगवेगळ्या शाखेच्या विद्यार्थ्यांचे गट बनवा. त्यांना हे प्रकल्प द्या. प्रकल्पावर काम करणे म्हणजे फक्त रोबो, कार बनविणे नव्हे. आम्ही स्मार्ट सिटी प्रोग्रॅममध्ये आहोत. आमचा अनुभव वापरा. आम्ही या मुलांना मार्गदर्शन करू, आम्ही तुमच्या सोबत राहू. समस्या सोडविण्यासाठी जरूर ते मार्गदर्शन करू. अशा प्रकल्पांसाठी विद्यावेतन देऊ. म्हणजे एकाचवेळी विद्यार्थी शिकू शकतील, प्रोजेक्ट करू शकतील आणि त्यांना अर्थार्जनही  होईल.’’

समाजाला परत काय देतो?
‘‘समस्या सोडविणाऱ्या प्रोजेक्टमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित होतील,'' अशी भूमिका मांडताना पवार म्हणाले, ‘‘ प्रत्येकजण उद्योजक बनला पाहिजे, असे नाही; मात्र प्रत्येकजण जबाबदार नागरिक बनला पाहिजे. आपण जे काही मिळवतो आहे, ते सत्कारणी लागते आहे का? आपण समाजाला काही परत देतो आहोत का? ही भावना अशा प्रकल्प अभ्यासातून विद्यार्थ्यांमध्ये रुजविता येईल. सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकून अमेरिकेत नोकरीसाठी जाण्याच्या उद्देशात बदल व्हावा. आपण ज्या समाजाच्या पैशावर शिकलो, त्या समाजाला परत काय दिले याचा 
विचारही व्हावा.’’

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

तुम्ही सतत शिकत राहा
‘‘ नव्या जगात नवे शिक्षण सतत घेत राहिला तरच टिकू शकाल,’’ असा कानमंत्र देताना पवार म्हणाले, ‘‘दरवर्षी महाविद्यालयांतून बाहेर पडणाऱ्या पदवीधरांपैकी ८० टक्के पदवीधर रोजगारक्षम नसतात. आपले शिक्षण त्यांना रोजगारक्षम बनविणारे नसेल, तर या व्यवस्थेत आमूलाग्र बदल केला पाहिजे. त्यासाठी बहुशाखीय  शिक्षण घेतले पाहिजे. ऑनलाइन शिक्षणाने सतत नवे शिकण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.’’ या वेबिनारला संयोजक संजय धायगुडे, शीतलकुमार रवंदळे  यांच्यासह राज्यातील सुमारे पाचशे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

जर्मनीतील शिक्षणाचे मॉडेल
बेरोजगारीवर मात करण्यासाठी जर्मनीचे मॉडेल पवार यांनी आपल्या भाषणात मांडले. त्यात पुढील बाबींचा समावेश होता.

  •     पदवीच्या पहिल्या वर्षीपासून उद्योगांत कामाची संधी
  •     विद्यार्थ्यांना शिकतानाच रोजगाराचा अनुभव
  •     शिकतानाच नव्या कल्पनांवर प्रत्यक्ष काम

विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी
    स्टार्टअपमध्ये अपयशाला घाबरू नका; अपयश हेच शिक्षण आहे.
    ऑनलाइन शिक्षणाद्वारे ज्ञान वाढवा. तीस टक्के वेळ नव्या शिक्षणासाठी द्या
    नवी कौशल्ये आत्मसात केल्यास एमएसएमई क्षेत्राला प्राध्यापकांकडूही मदत शक्य
    कोणतीही गोष्ट फुकट घेऊ नका

पवार म्हणाले ...
खेडी, शहरे स्मार्ट करण्यासाठी बहुशाखीय भूमिका आवश्‍यक
आमचा स्मार्ट सिटी प्रोग्रॅमचा अनुभव तुम्हाला फायदेशीर
समस्या तुमच्या; मार्गदर्शन आमचे
प्रकल्पावरील कामासाठी विद्यावेतन देऊ
प्रत्येक जण जबाबदार
नागरिक बनायलाच हवा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com