'सकाळ'च्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहमेळावा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जानेवारी 2017

आजवरील वाटचालीत "सकाळ' आणि वाचक यांच्यात अतूट नाते निर्माण झाले आहे. या नात्याला उजाळा देणारा क्षण म्हणजे "सकाळ'चा वर्धापन दिन.

पुणे - आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात नववर्षाची नवी सकाळ आनंदाच्या, उत्साहाच्या वातावरणात काही तासांपूर्वीच उगवली आहे. तितक्‍याच आनंदात अन्‌ उत्साहात "सकाळ'चा 85वा वर्धापन दिनही आज (ता. 1) साजरा होणार आहे, आपल्या खास उपस्थितीत. खर तर विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि वाचक यांना एकत्र आणणारा हा क्षण आहे. या सर्वांचे "सकाळ' मनापासून स्वागत करत आहे.

नव्या-जुन्या पिढीतील वाचकांचे "सकाळ'ला भरभरून प्रेम मिळत आहे. दैनिक किंवा साप्ताहिकच नव्हे, तर "साम वाहिनी', "ई-सकाळ' आणि इतर "सोशल मीडिया'च्या माध्यमातूनही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वाचक "सकाळ'शी जोडला गेलेला आहे. वाचकांच्या प्रतिसादामुळेच "सकाळ' ही वाटचाल करत आहे आणि या प्रतिसादामुळेच तर "सकाळ' महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे.

आजवरील वाटचालीत "सकाळ' आणि वाचक यांच्यात अतूट नाते निर्माण झाले आहे. या नात्याला उजाळा देणारा क्षण म्हणजे "सकाळ'चा वर्धापन दिन. यानिमित्ताने आपल्या सर्वांना एकत्र भेटता यावे, शुभेच्छा देता याव्यात, म्हणून "सकाळ'च्या बुधवार पेठेतील कार्यालयाच्या आवारात स्नेहमेळावा आयोजिण्यात आला आहे. तो आजच (ता. 1) सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ या वेळेत होणार आहे. यानिमित्ताने आपल्यातील नाते अधिक बळकट करण्याचा हा प्रयत्न आहे. या सोहळ्यास येताना पुष्पगुच्छ आणू नयेत, अशी विनंती "सकाळ'तर्फे करण्यात आली आहे.

- तारीख : 1 जानेवारी (रविवार)
- वेळ : सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ
- स्थळ : सकाळ कार्यालय, बुधवार पेठ

Web Title: sakal media group 85th anniversary