स्वारगेट चौकातील "प्रयोग' फसला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

पुणे - स्वारगेट येथील केशवराव जेधे उड्डाण पुलावर "उलटा-पुलटा' प्रयोगामुळे जेधे चौकातील कोंडी कमी झाली नसल्याचे बुधवारी दिसून आले.
शंकरशेठ रस्त्याकडून सारसबागेकडे जाताना उड्डाण पुलावरून उलट दिशेने जाण्यास वाहनचालक फारसे इच्छुक नसल्यामुळे या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये. त्यामुळे जेधे चौकामध्ये बस, रिक्षांसह दुचाकी आणि चारचाकींचे प्रमाण कमी झालेले नाही. दरम्यान, उलट दिशेने येऊन सारसबागेकडे जाणारी वाहने धोकादायक पद्धतीने उड्डाण पुलावर वळत असल्यामुळे तेथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

नागरिकांना पूर्वसूचना न देता परस्पर वाहतूक व्यवस्थेत बदल करून जेधे चौकात गेले चार दिवस "प्रयोग' सुरू आहे. जेधे चौकातील "ग्रेडसेपरेटर'च्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून उड्डाण पुलाचा विचित्र पद्धतीने वापर करण्याची योजना वाहतूक पोलिसांनी सुरू केली आहे. या योजनेमुळे जेधे चौकातील वाहतूक कोंडी सुमारे 40 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचा दावा वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे यांनी मंगळवारी केला होता. प्रत्यक्षात चौकातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मात्र वेगळाच अनुभव येत आहे.

शंकरशेठ रस्त्याकडून स्वारगेटकडे येताना "ग्रेडसेपरेटर'च्या अलीकडेच वाहतुकीला उजव्या बाजूकडील उड्डाण पुलावर वळविण्यात आले आहे. "सारसबागेकडे जाण्यासाठी' असा उल्लेख असलेला फलक त्या ठिकाणी लावला आहे. त्यामुळे कात्रजकडे जाणारी वाहने डावीकडून जेधे चौकापर्यंत आणि तेथून डावीकडे वळून कात्रजला जाऊ शकतात, तर सारसबागेकडे जाणाऱ्यांनी उजवीकडे वळणे अपेक्षित आहे. परंतु हा फलक पाहून क्षणार्धात निर्णय घेण्याची वाहनचालकांची मानसिकता नसल्यामुळे अनेक जण जेधे चौकातच जाणे पसंत करीत आहेत.

त्याचप्रमाणे कात्रज, पद्मावतीकडून सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनांना सातारा रस्त्यावरून उड्डाण पुलावर चढण्यास मनाई करण्यात आल्यामुळे सर्व वाहने पुलाखालून जेधे चौकापर्यंत येत आहेत. चौकात आल्यावर डावीकडे वळून सारसबागेकडे जाण्याची वाहनचालकांची मानसिकता आहे. परिणामी जेधे चौकातील कोंडी वाढल्याचे चित्र दिसत आहे.

"सकाळ'च्या वृत्ताची दखल
"सकाळ'मध्ये आलेल्या बातमीची दखल घेत महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागातर्फे वाहतूक पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. कात्रज-पद्मावतीकडून आलेल्या वाहनांना सारसबागेकडे जाण्यासाठी सातारा रस्त्यावरून उड्डाण पुलावर जाण्यास परवानगी द्यावी, अशा सूचना महापालिकेतर्फे पोलिसांना देण्यात आल्या आहेत. बुधवारी दिवसभर याची चाचणी घेऊन अपेक्षित परिणाम साधला गेल्यास ही व्यवस्था सुरू ठेवण्यात येईल, असे आश्‍वासन पोलिसांकडून महापालिका अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

Web Title: sakal news impact