पुण्यात दिवसभरात मिळाले 24 आयसीयू बेड; सकाळच्या बातमीचा दणका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जुलै 2020

अत्यवस्थ रुग्णांना व्हेंटिलेटर आणि आयसीयू युनिट मिळत नसल्याचे वास्तव 'सकाळ'ने शनिवारी उघडकीस आणले आणि त्यानंतर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी खासगी हॉस्पिटलची तपासणी करत बेड ताब्यात घेतल्या.

पुणे : कोरोनाच्या अत्यावस्थ रुग्णांसाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये शनिवारी एकाच दिवसांत २४ 'आयसीयू बेड' मिळाले तर, आणखी ९५ बेड उपलब्ध होतील. त्यामुळे मृत्युचा सामना करणाऱ्या रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. अत्यवस्थ रुग्णांना व्हेंटिलेटर आणि आयसीयू युनिट मिळत नसल्याचे वास्तव 'सकाळ'ने शनिवारी उघडकीस आणले आणि त्यानंतर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी खासगी हॉस्पिटलची तपासणी करत बेड ताब्यात घेतल्या.

जहाँगीर हॉस्पिटलसह अन्य दोन खासगी हॉस्पिटल्सनी शनिवारी आपल्याकडच्या २४ बेड महापालिकेला दिल्या. तर ससूनमधील ५० बेडसह जहाँगीर ७, संचेती १५, पूनावाला ७, देवयानी हॉस्पिटलमध्ये ९ बेड मिळणार आहे. या सर्व बेड ‘आयसीयू’ विभागातील आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, महापालिका आणि खासगी हॉस्पिटलमध्ये यंत्रणा अपुरी पडत आहे. विशेषत: अत्यावस्थ रुग्णांना वेड मिळत नसल्याने ते 'ऑक्सिजन'चा वापर करीत, मुत्यूशी झुंज देत असल्याचे वृत्त सकाळ'ने शनिवारी प्रसिध्द केले होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने खासगी हॉस्पिटलमध्ये नेमलेल्या अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करीत, बहुतांशी हॉस्पिटलमधील खाटांची माहिती जाणून घेतली.

हे वाचा - 'कॉमन मॅन'नंही घातला मास्क; पुणेकरांनो, आता तरी मास्क घालणार की नाही?

प्रामुख्याने कोरोनामुक्त झालेल्या आणि घरी सोडलेल्या खाटा कुठे आहेत. याचा शोध घेण्याच्या सूचना करत, अग्रवाल यांनी या खाटा ताब्यात घेतल्या.  त्यापलीकडे, ज्या रुग्णांना पुढच्या एक-दोन दिवसांत घरी सोडले जाणार आहे. त्याही खाटा ताब्यात घेण्याची कार्यवाही केली आहे. त्यामुळे पुढच्या दोन दिवसांत पुण्यातील कोरोना रुग्णांना आणखी खाटा उपलब्ध होतील.

कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असली तरी, त्यांना वेळेत उपचार व्यवस्था पुरविण्याचा प्रयत्न आहे. त्यानुसार ते दिलेही जात आहेत. मात्र, अत्यावस्थ रुग्णांपैकी सगळ्यांना आता आयसीयू वेड उपलब्ध होतील, याला प्राधान्य आहे. त्यामुळे उपचारा अभावी कोणाचा मृत्यू होणार नाही. 
- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त महापालिका

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चाळीशीपुढील रुग्णांना गरज
अत्यवस्थ असलेले वीसही रुग्ण 40 ते 60 आणि 70 ते 75 वयोगटातील असून, त्यांच्यावर छोटी खासगी हॉस्पिटल आणि घरांत उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. पुण्यात कोरोनाने ओढवलेली स्थिती खरोखरच हाताबाहेर गेली असून, आता रोज सरासरी दोन हजाराच्या घरात नवे रुग्ण सापडत आहेत. त्यात अन्य आजारांच्या विशेषत: अस्थमा, मधुमेहाच्या किमान 60 ते 65 जणांना "व्हेंटिलेटर' आणि "आयसीयू बेड'ची गरज भासत असल्याची बातमी सकाळने प्रसिद्ध केली होती. 

Edited By - Suraj Yadav


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal news impact corona patient get 24 icu bed