घशाची कोरड प्रशासनाच्या गळी उतरली

महेंद्र शिंदे
शनिवार, 12 मे 2018

कडूस - खेड तालुक्‍यामधील अकरा गावांतील एक गावठाण व ४८ वाड्या-वस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव गेल्या दीड महिन्यांपासून लाल फितीत अडकून पडलेले असल्याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. त्यामुळे संबंधित प्रशासन कामाला लागले आणि दोनच दिवसांत प्रस्ताव वेगाने पुढे सरकले. अकरापैकी नऊ गावांतील टंचाईग्रस्त ४५ वाड्या-वस्त्यांची तहसीलदार स्तरावरील संयुक्त तपासणी पूर्ण करून हे प्रस्ताव टॅंकरच्या अंतिम मंजुरी आदेशासाठी चारच दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयात पोचले आहेत.

कडूस - खेड तालुक्‍यामधील अकरा गावांतील एक गावठाण व ४८ वाड्या-वस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव गेल्या दीड महिन्यांपासून लाल फितीत अडकून पडलेले असल्याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. त्यामुळे संबंधित प्रशासन कामाला लागले आणि दोनच दिवसांत प्रस्ताव वेगाने पुढे सरकले. अकरापैकी नऊ गावांतील टंचाईग्रस्त ४५ वाड्या-वस्त्यांची तहसीलदार स्तरावरील संयुक्त तपासणी पूर्ण करून हे प्रस्ताव टॅंकरच्या अंतिम मंजुरी आदेशासाठी चारच दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयात पोचले आहेत.

खेड तालुक्‍यातील अकरा गावांमधील एक गावठाण व ४८ वाड्या-वस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा, अशा मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे दीड महिन्यापूर्वी आले होते. पंचायत समितीने हे प्रस्ताव संयुक्त तपासणीसाठी तहसीलदार कार्यालयाकडे पाठवले होते. त्यानंतर संयुक्त तपासणीच्या फेऱ्यात अडकलेल्या या प्रस्तावांवर पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. गेल्या दीड महिन्यापासून हे प्रस्ताव लाल फितीतच अडकून पडले होते. त्यामुळे या अकरा गावांतील ११ हजार ३२७ लोकवस्तीला पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. मे महिना उजाडला, तरी टॅंकरने पाणीपुरवठा करण्याबाबत शासकीय स्तरावर काहीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे प्रशासनाच्या वेळखाऊ व प्रस्ताव दाबून ठेवण्याच्या भूमिकेबाबत टंचाईग्रस्त ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत असल्याचे वृत्त रविवारी (ता. ६) ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आणि धूळ खात पडलेल्या या प्रस्तावांच्या शोधाशोधीला सुरवात झाली. 

पंचायत समितीच्या सभापती सुभद्रा शिंदे व उपसभापती अमोल पवार यांनी ‘सकाळ’च्या वृत्ताची गांभीर्याने दखल घेतली. सोमवारी कार्यालयीन कामकाज सुरू झाल्यानंतर उपसभापती पवार यांनी पंचायत समिती व तहसीलदार कार्यालयातील टॅंकरने पाणीपुरवठा कामकाज पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. दोन्ही कार्यालयांतील कागदी घोडे पळवणाऱ्या यंत्रणेचा कडक शब्दांत समाचार घेतला. नायब तहसीलदार राजेश कानसकर व गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार यांच्याशी संपर्क साधून तातडीने टंचाईग्रस्त गावांची संयुक्त तपासणी करण्याची व हे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दोनच दिवसांत पाठविण्यासाठी लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नायब तहसीलदार कानसकर यांनी स्वतः गावोगावी प्रत्यक्ष भेटी देऊन या टंचाईग्रस्त गावांची दोनच दिवसात संयुक्त तपासणी केली. 

 चार टॅंकरची गरज
या अकरापैकी नऊ गावांतील ४५ वाड्या-वस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची गरज आहे. त्यामुळे हे प्रस्ताव पुढील मंजुरी आदेशासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पोचले आहेत. यामध्ये वाशेरे, वाडा, कोयाळीतर्फे वाडा, साबुर्डी, वरुडे, कोयाळी तर्फे वाडा, कनेरसर, कुरकुंडी व दोंदे आदी नऊ गावांचा समावेश आहे. या ४५ वाड्या-वस्त्यांतील ९६६९ नागरिकांना पाणीपुरवठ्यासाठी चार टॅंकरची गरज आहे. अकरा गावांच्या बारा प्रस्तावांपैकी नऊ गावांचे दहा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवले आहेत. टेकवडी आणि आंभू गावची तपासणी आज पूर्ण होईल. त्यानंतर एक दोन दिवसांत हेसुद्धा प्रस्ताव तातडीने वरिष्ठ कार्यालयात पाठवले जाईल, अशी माहिती पंचायत समितीच्या सूत्रांनी दिली.  

चार टॅंकरची मागणी केली आहे. वरिष्ठ कार्यालयातून मंजुरी आदेश आणि टॅंकर मिळाल्यानंतर सोमवारपर्यंत टॅंकर सुरू होण्याची शक्‍यता आहे. 
 - राजेश कानसकर, नायब तहसीलदार 

Web Title: sakal news impact Water supply proposal issue