अरे, आव्वाज कोणाचा...ऽऽ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

स्पर्धेचा निकाल जाहीर होताना निर्माण झालेली उत्कंठता... चेहऱ्यावर फुललेले स्मित... टाळ्यांचा प्रचंड कडकडाट... ‘हिप हिप हुर्रे...’, ‘आवाज कोणाचा...’ अशा घोषणांसह जल्लोष... एकमेकांचे अभिनंदन करणारे विद्यार्थी... अशा भावविश्वात ‘सकाळ एनआयई’ आंतरशालेय नाट्यस्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात पार पडले.

पुणे - स्पर्धेचा निकाल जाहीर होताना निर्माण झालेली उत्कंठता... चेहऱ्यावर फुललेले स्मित... टाळ्यांचा प्रचंड कडकडाट... ‘हिप हिप हुर्रे...’, ‘आवाज कोणाचा...’ अशा घोषणांसह जल्लोष... एकमेकांचे अभिनंदन करणारे विद्यार्थी... अशा भावविश्वात ‘सकाळ एनआयई’ आंतरशालेय नाट्यस्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात पार पडले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘सकाळ माध्यम समूहा’च्या सकाळ एनआयईतर्फे आयोजित आंतरशालेय नाट्यस्पर्धेतील विजेत्या शाळा आणि विद्यार्थ्यांना ‘सकाळ’च्या संचालिका मृणाल पवार यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शिवाजीनगर येथील चंद्रकांत दरोडे विद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या समारंभात चंद्रकांत दरोडे विद्यालय मुख्याध्यापिका (प्राथमिक) संगीता अंत्रे, मुख्याध्यापिका (माध्यमिक) ज्योती देडगे, परीक्षक प्रा. तुकाराम पाटील, प्रमोद आर्विकर, अमोल कचरे, अरुण पवार, सुवर्णा बागल उपस्थित होते. ‘निसर्ग संकट’, ‘सोशल मीडिया व बदलती शिक्षणपद्धती’ या विषयांवर मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेतून नाटिका सादर केल्या. या स्पर्धेत पुणे शहर, पिंपरी- चिंचवड व पुणे जिल्ह्यातील ४१ शाळा सहभागी झाल्या होत्या. 

परीक्षेचे टेंशन कसले घेता बिनधास्त बोला

मृणाल पवार म्हणाल्या, ‘विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या उत्साहामुळे या स्पर्धेला मोठे स्वरूप मिळत आहे. यात कोण जिंकले कोण हरले हे महत्त्वाचे नाही. तर, नाटक सादर करताना अभिनय कसा करावा, संवाद कसा असला पाहिजे, हे नाट्यगुण आत्मसात व्हावेत, त्यांना व्यासपीठ मिळावे यासाठी सकाळ एनआयईतर्फे ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. या स्पर्धेत उत्तमप्रकारे सादरीकरण करताना त्यांच्यातील आत्मविश्‍वास वाढत आहे.’’ 

प्रा. तुकाराम पाटील म्हणाले, ‘सकाळ’ने आयोजित केलेली नाट्यस्पर्धा बहरत आहे. रंगमंचावर वावरणारी ही चिमुरडी मुले भविष्यात मोठे कलाकार होणार आहेत, त्यांच्यात तेवढी क्षमता आहे. स्पर्धेचे परीक्षण करताना यात समतोल राखला आहे. सकारात्म पद्धतीने विषय मांडण्यावर भर देण्याची गरज आहे.’’ 

विशाल सराफ यांनी सूत्रसंचालन केले. या स्पर्धेसाठी चंद्रकांत दरोडे प्राध्यमिक व माध्यमिक विद्यालय आणि ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय यांचे विशेष सहकार्य लाभले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal nie drama competition award distribution