esakal | प्रिय भक्तगण हो!
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

प्रिय भक्तगण हो!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सु. ल. खुटवड (९८८१०९९०९०)

प्रिय भक्तगण हो ! आज माझं आगमन झाल्यानं तुमचा उत्साह ओसंडून वाहत आहे. तुमच्या भेटीने मीदेखील खूप सुखावलो आहे. आपल्यात विघ्नं आणणाऱ्या कोरोनाला यंदा गर्दी जमवून ठेचून मारायचं नसून, सुरक्षित अंतर पाळून त्याला पळवून लावायचं आहे, हे लक्षात ठेवा. गेल्यावर्षी कोरोनामुळे आपली भेट काही व्यवस्थित झाली नाही. त्याची हूरहूर माझ्या मनाला वर्षभर लागली होती. सव्वाशे वर्षापेक्षा जास्त काळ मी पृथ्वीतलावर गणेशोत्सवासाठी येत आहे. मात्र, अशी बिकट परिस्थिती कधीही ओढवली नव्हती. यंदाही सगळं काही सुरळीत आहे, असं समजू नका. कोरोनाविषयक नियम व अटी पाळणार असाल तरच मी दहा दिवस मुक्काम करील, हे सांगून ठेवतो. आधीच आई-बाबा मला यंदा खाली पाठवायला उत्सुक नव्हते. मात्र, तुमच्या प्रेमापोटी मी त्यांची कशीबशी समजूत घातली आहे.

भक्तांनो, मी तुम्हाला आधीच इशारा देऊन ठेवतो, माझे कान सुपासारखे मोठे आहेत, म्हणून मी काहीही ऐकून घेणार नाही. माझी आरती नीट पाठ करा. जर कोणी ''फळीवर वंदना'' आणि ''दास रामाचा वाट पाहे सजना'' म्हटलं तर सजनाच्या घरी नेऊन फळी तुटेस्तोवर मारण्याची व्यवस्था केली जाईल. ''तुम्ही जी ''फळीवर वंदना'' उभी करता, आधी तिला खाली घ्या. नाहीतर ते जमत नसेल तर मला कैलास पर्वतावर तरी जाऊ द्या. तसेच कोणाचीही ''ओटी शेंदुराने भरु नका'' ''ओवाळू आरत्या सुरवंट्या येती'' असं कोणी म्हणाल्यास म्हणणाऱ्याचाच सुरवंट करीन. दरवर्षीप्रमाणे यंदाही माझ्या अंगणात पशु- पक्ष्यांची शाळा भरवू नका. ‘‘कोंबडी पळाली’...‘चिमणी उडाली भुर्र...’ , ‘नवीन पोपट हा...’ ‘माझा कोंबडा कोणी मारिला...’ या सारख्या गाण्यांवर मद्यपान करून, बेफामपणे थिरकू नका. नाहीतर ‘तुमची शिटी वाजली’ म्हणून समजा.

हेही वाचा: पुण्यात संचारबंदी नाही, जमावबंदी लागू; वाचा काय आहे आदेश?

मुली- बाळींची कोणी छेड काढणार नाही, याकडे प्रत्येकाने लक्ष ठेवा. प्रत्येक महिलेला गणेशोत्सव काळात सुरक्षित वाटेल, याची काळजी घ्या. हे दहा दिवस आमच्यासाठी उत्साहवर्धक आणि चैतन्यमयी असतात, अशी तुमची भावना असते ना. त्याला कोठेही तडा जाणार नाही, याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. अनेकदा पहिले सगळे दिवस उत्साहात जातात. मात्र, विसर्जनाच्या दिवशी अनेकांचा संयम सुटतो, असा माझा अनुभव आहे. चोवीस तासांपेक्षा जास्त काळ मिरवणुका लांबतात. त्यामुळे पोलिसांसह सगळ्यांच्यावरच ताण येतो. त्याला कोठेतरी आळा घालायला पाहिजे.

भक्तांनो, कोणालाही रांगेत उभे न राहता, लसीचे दोन डोस वेळेत मिळोत, आगामी वर्षांत खड्डेमुक्त रस्त्यांवरून तुमचा प्रवास घडो, चिखलाने भरलेल्या खड्ड्यातील पाणी तुमच्या अंगावर कधीही न उडो, बारा महिने चोवीस तास तुमच्या नळाला पाणी येवो, तुमच्या तोंडावरील मास्क कायमस्वरूपी हटो, तुमच्याकडून पाचशे रुपयांचा दंड पोलिसांना कधीही न मिळो, चित्रपटगृह- नाट्यगृहात जाऊन तुमचे भरपूर मनोरंजन होवो, कधीही लॉकडाउन, कडक निर्बंध, संचारबंदी असले शब्द परत तुमच्या कानावर कधीही न पडो, सुनसान रस्ते आणि भीतीदायक वातावरणाचा परत तुम्हाला कधीही अनुभव न येवो, शाळांमधील किलबिल पुन्हा सुरू होवो, कॉलेजमधील तरूणाईमध्ये चैतन्य पुन्हा पसरो, सर्वत्र आनंदाचा झरा पूर्वीसारखा झुळूझुळू वाहो, अशा शुभेच्छा मी तुम्हाला गणेशोत्सवानिमित्त देत आहे.

हेही वाचा: बेळगाव जिल्ह्यात हवाई, नौदलाने वाचविले 45 जणांना

प्रिय भक्तांनो, पुढील वर्षी सगळं काही सुरळीत होईल, अशी अपेक्षा ठेवतो. त्यासाठी तुम्ही आतापासूनच संयमाने वागलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. कोरोनाविषयक नियम तुम्ही काटेकोरपणे पाळलेत तरच ‘पुढच्या वर्षी लवकर या’ या तुमच्या हाकेला मी धावून येईल, एवढं लक्षात ठेवा. चला आता पुढील दहा दिवस मंगलमय व भक्तीमय वातावरणात आपण एकमेकांवर आनंद आणि प्रेमाची उधळण करू या !

loading image
go to top